दुबईत पार्किंगवरुन भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीचा वाद; न्यायालयाने एकाला देशातून काढले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:20 IST2024-12-17T18:19:23+5:302024-12-17T18:20:58+5:30
दुबईतील कायदे अतिशय कडक आहेत.

दुबईत पार्किंगवरुन भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीचा वाद; न्यायालयाने एकाला देशातून काढले...
Dubai Law : दुबई एक असा देश आहे, जो आपल्या कठोर कायद्यांसाठी ओळखला जातो. जगातील सर्वात सुरक्षित देशांमध्येही दुबईची गणना केली जाते. दुबईचे कायदे अनेकदा चर्चेत असतात. सध्या दुबईतील एका प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे, ज्यात किरकोळ पार्किंगच्या वादामुळे दोघांना कठोर कायद्याचा सामना करावा लागला.
पार्किंगचा वाद, थेट देश सोडण्याचा आदेश
गल्फ न्यूजनुसार, ही घटना गेल्या वर्षी 8 फेब्रुवारी रोजी घडली होती. दुबईच्या टेलिकॉम क्षेत्रात पार्किंगवरुन एक भारती आणि एक पाकिस्तानी, अशा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी न्यायालयाने एका पाकिस्तानी वृद्धाला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला देशातून हद्दपार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
वाद कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, एका 70 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने 34 वर्षीय भारतीय व्यक्तीची पार्किंगची जागा बळकावली होती. हे प्रकरण इतकं तापलं की, संतापलेल्या पाकिस्तानी व्यक्तीने भारतीयाला धक्काबुक्की केली. यावेळी भारतीय व्यक्तीचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्याच्या डाव्या पायाच्या फ्रॅक्चर झाल्यामुळे, त्याने पायाची कार्यक्षमता 50 टक्के गमावली, म्हणजेच त्याला त्याच्या पायात अपंगत्व आले.
प्रत्युत्तरात भारतीयानेही हल्ला केला
या घटनेनंतर भारतीय व्यक्तीनेही वृद्ध पाकिस्तानी व्यक्तीच्या डोक्यात मारले. त्याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानी व्यक्ती सुमारे 20 दिवस आपले दैनंदिन काम करू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले. अखेर दुबईच्या न्यायालयाने पाकिस्तानी व्यक्तीला दोषी ठरवत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिवाय, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला दुबईतून हद्दपार केले जाईल.