अमेरिकेत भारतीयाची हत्या

By admin | Published: February 25, 2017 12:34 AM2017-02-25T00:34:30+5:302017-02-25T00:34:30+5:30

कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या केल्याने अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली आहे.

Indian assassination in America | अमेरिकेत भारतीयाची हत्या

अमेरिकेत भारतीयाची हत्या

Next

ह्यूस्टन : कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या केल्याने अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली आहे. आमच्या देशातून चालते व्हा ; अतिरेक्यांनो, असे हा हल्लेखोर म्हणत होता, असे सांगण्यात येते शहरात गजबजलेल्या बारमध्ये झालेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हा वर्णद्वेषाने प्रेरित गुन्हा आहे. गोळीबारात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोटला (३२) यांचा मृत्यू झाला. ते आॅलेथ स्थित गार्मिन मुख्यालयात कार्यरत होते. माजी नेमबाज एडन पुरिनतोन (५१) याने हा गोळीबार केला. त्याचा आणि या इंजिनीअरचा वर्णद्वेषावरुन वाद झाला होता. या हल्ल्यात अन्य एक भारतीय व त्यांचा सहकारी अलोक मदसानी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यात अमेरिकी नागरिक ईआन ग्रीलट हे आहेत. आॅलेथच्या आॅस्टिन बार अँड ग्रिल येथे ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले, पुरिनतोन हा वाद झाल्यानंतर येथून निघून गेला होता. पण, तो बंदूक घेऊन परत आला. बारचे सुरक्षारक्षक टीव्हीवर बॉस्केटबॉलची मॅच पाहत होते.
आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खून आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस एफबीआयसोबत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दु:ख व्यक्त करत सांगितले की, भारतीय दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांना तातडीने कॅनसस येथे पाठविण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे की, गोळीबाराच्या या घटनेचा मला धक्का बसला आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना यांच्याशी मी चर्चा केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले, कुचीभोटला आणि मदसानी हे अनुक्रमे हैदराबाद आणि वारंगल येथील रहिवासी आहेत. भारतीय दूतावासाचे अधिकारी जखमींना मदत करतील. तर, या इंजिनिअरचे पार्थिव देशात आणण्यासही मदत केली जाईल. घटनेची आणखी माहिती घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian assassination in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.