अमेरिकेत भारतीयांवरील हल्ले सुरूच, आता शीख तरुणावर गोळीबार
By admin | Published: March 5, 2017 08:56 AM2017-03-05T08:56:03+5:302017-03-05T10:36:32+5:30
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, आजवॉशिंग्टन राज्यातील केंट भागात एका बुरखाधारी इसमाने
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 5 - अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, आजवॉशिंग्टन राज्यातील केंट भागात एका बुरखाधारी इसमाने भारतीय वंशाच्या शीख तरुणावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये हा शीख तरुण जखमी झाला आहे. दरम्यान, गोळीबार करताना हल्लेखोराने या तरुणाला मायदेशात परतण्याची धमकी दिली.
याआधी अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट आणि 43 वर्षीय हरनिश पटेल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हरनिश पटेल यांच्या हत्येला एक दिवस उलटत नाही तोच या शीख तरुणावर हल्ला झाला आहे. हा शीख तरुण शुक्रवारी आपल्या घराबाहेर गाडीची साफसफाई करत असताना ही घटना घडली. हल्ला झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव दीप राय असून, तो अमेरिकन नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन हा गोळीबार झाला. तर पीडित तरुणाने सांगितले की एक बुरखाधारी व्यक्ती आपल्या जवळ आली आणि त्याने मला आपल्या देशात परत जाण्याचे बजावत गोळीबार केला. दरम्यान केंट पोलिसांनी या प्रकाराच्या चौकशीस सुरुवात केली असून, तपासासाठी एफबीआयसह अन्य काही तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे.
22 फेब्रुवारी रोजी कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला (32) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर गुरुवारी 43 वर्षीय हरनिश पटेल यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Name of the victim is Deep Rai. He is 39 years old and is a US citizen. He has been shot on the arm: Sources on Sikh man shot in Seattle
— ANI (@ANI_news) March 5, 2017