अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवार रिंगणात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:26 AM2019-01-13T06:26:47+5:302019-01-13T06:27:02+5:30
डेमोक्रॅटिक पक्षाच्या इच्छुकांमध्ये तुलसी गब्बार्ड
वॉशिंग्टन : हवाई बेटांतून अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेवर सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या तुलसी गब्बार्ड यांनी २०२० मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या स्पर्धेत उतरण्याचे जाहीर केले आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा निवडणूक लढविण्याचे याआधी जाहीर केले आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक इच्छुकांमधून गब्बार्ड यांना खरोखरच उमेदवारी मिळाली तर अमेरिकेची अघ्यक्षीय निवडणूक लढविणाºया त्या पहिल्या हिंदू उमेदवार ठरतील.
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची कारणे विशद करताना ३७ वर्षांच्या गब्बार्ड यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, अमेरिकी जनतेपुढे असलेल्या अनेक आव्हानांविषयी मी चिंतित असून, त्यांची सोडवणूक करण्याची माझी इच्छा आहे. आरोग्य सेवा, फौजदारी न्यायव्यवस्था याखेरीज युद्ध आणि शांतता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे.डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार निवडण्यासाठी प्राथमिक मतदानास फेब्रुवारी २०२० मध्ये इवोहा राज्यातून सुरुवात होईल. उमेदवाराची अंतिम निवड त्या वर्षीच्या उन्हाळ्यात पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात होईल. जो उमेदवार ठरेल तो फेब्रुवारी २०२० मध्ये होणाºया निवडणुकीत ट्रम्प यांच्याविरुद्ध डेमोक्रॅटिक उमेदवार असेल. (वृत्तसंस्था)
राजकीय निरीक्षक काय म्हणतात
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणूक लढविण्यास उत्सुक म्हणून पुढे आलेल्या गब्बार्ड या दुसºया महिला आहेत. याआधी ज्या डझनभर इच्छुकांची नावे पुढे आली आहेत, त्यात कॅलिफोर्नियातील भारतीय वंशाच्या काँग्रेस सदस्या कमला हॅरिस यांचा समावेश आहे. माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन हेही निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत.
गब्बार्ड यांनी इच्छा जाहीर केली असली तरी त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणे व त्या निवडून येणे खूपच दुरापास्त असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. अमेरिकेच्या लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण एक टक्काही नाही. जे हिंदू आहेत ते भारतातून आलेले किंवा त्यांचे वंशज आहेत.