भारतीय हुशारीला जगात ५१वे स्थान, टॅलेंटमध्ये चीन पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 06:24 AM2017-11-22T06:24:54+5:302017-11-22T06:26:22+5:30
भारतीयांचे ‘ब्रेन ड्रेन’(विद्वत्ता) देशाबाहेर जात असल्याचा विषय अनेकदा चर्चेत आला असला तरी आता भारतीयांच्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेवर प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.
मुंबई : भारतीयांचे ‘ब्रेन ड्रेन’(विद्वत्ता) देशाबाहेर जात असल्याचा विषय अनेकदा चर्चेत आला असला तरी आता भारतीयांच्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेवर प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक टॅलेंटमध्ये भारत क्रमांक ५४ वरून ५१ वर आला आहे.
‘आयएमडी वर्ल्ड टॅलेंट’ अहवालानुसार भारतीय टॅलेंट २०१३ पासून सातत्याने सुधारत आहे. भारताचा क्रमांक २०१४ मध्ये केवळ एका पायरीने खाली आला होता. त्यानंतर ५६, मागील वर्षी ५४ व आता ५१ वर आला आहे. आयएमडीने ६३ देशांची शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास, शिक्षणाची माहिती व शिक्षणासाठीची तयारी अशा तीन मुख्य श्रेणीत सर्वेक्षण केले. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास श्रेणीत भारताची स्थिती अद्याप बिकटच असून, त्यामध्ये क्रमांक ६२ वा आहे. शिक्षणासंबंधी माहितीमध्ये ४३ वा तर शिक्षणासाठीच्या तयारी श्रेणीत २९ वा क्रमांक आहे. एकूण क्रमवारीत भारतीय टॅलेंट ६३ देशांमध्ये ५१ व्या स्थानी आहे. भारतात शिक्षणावर जीडीपीच्या तीन टक्के गुंतवणूक होत असून त्याची क्रमवारी ५८ वी आहे. भारतात प्रत्येक विद्यार्थ्यावर जीडीपीच्या १६.८ टक्के खर्च होत असून, त्यात भारत ४५ व्या स्थानी आहे.
>अमेरिका दखल घेईल?
अमेरिकेकडून भारतीयांना देण्यात येणा-या व्हिसामध्ये कपात झाली आहे. याआधी वर्षाला १ लाख व्हिसा मिळत होते. ते आता
६५ हजार झाले आहेत. जागतिक टॅलेंटमध्ये भारत सक्षम होत असताना अमेरिका त्याची दखल घेणार का, हा प्रश्न आहे.
>‘ब्रिक्स’ देशांत चौथे स्थान
जागतिक स्थिती सुधारली असली तरी ‘ब्रिक्स’ देशांत भारत अद्यापही चौथ्या स्थानी आहे. यात चीन ४०, रशिया ४३, दक्षिण आफ्रिका ४८ व्या स्थानी आहे. ब्राझिल भारताच्या मागे ५२ व्या स्थानी आहे.
>अव्वल १५ मध्ये ११ देश युरोपियन
टॅलेंटच्या बाबतीत युरोप अव्वल आहे. अव्वल १५ मध्ये ११ देश युरोपियन आहेत. स्वित्झर्लंड, डेन्मार्क व बेल्जियम हे पुढे आहेत. 18आशियाई देशांचा या सर्वेक्षणात समावेश होता. पण पाकिस्तानचे सर्वेक्षणच झाले नाही.