भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेत ९१ हजार नोकऱ्या
By admin | Published: July 16, 2015 04:44 AM2015-07-16T04:44:02+5:302015-07-16T04:44:02+5:30
भारतातील मोठ्या १०० कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत १५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करून ९१ हजारांपेक्षाही जास्त नव्या नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
वॉशिंग्टन : भारतातील मोठ्या १०० कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत १५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करून ९१ हजारांपेक्षाही जास्त नव्या नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि ग्रँट थॉर्नटनच्या (जीटी) ‘इंडियन रुटस्,अमेरिकन सॉईल’ नावाच्या या अहवालात टेक्सास या दक्षिण प्रांतात भारतीय कंपन्यांनी सर्वाधिक ३ अब्ज ८४ कोटी डॉलरची विदेशी गुंतवणूक केली आहे, असे म्हटले. त्यानंतर पेनसिल्व्हानिया ३ अब्ज ५६ कोटी डॉलर, मिनिसोटा १ अब्ज ८० कोटी डॉलर, न्यूयॉर्क १ अब्ज १० कोटी डॉलर आणि १ अब्ज डॉलरची गुंतवणूक न्यू जर्सीमध्ये झाली आहे.
कॅपिटोल हिल येथे मंगळवारी हा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी सिनेटर जॉन कारनिन आणि मार्क वॉर्नरसह २० वरिष्ठ संसद सदस्य उपस्थित होते. भारताचे अमेरिकेतील राजदूत अरण सिंह म्हणाले की, भारतीय उद्योगांच्या अमेरिकेतील वाढत्या योगदानाचे व प्रभावाचे हा पुरावा आहे. त्यातून आमचे अमेरिकेबरोबर चांगल्या संबंधांचा महत्त्वाचा घटक आहे. भारतीय कंपन्या आज केवळ नोकऱ्याच तयार करीत नसून स्थानिक रहिवाशांच्या विकासात आणि समृद्धीसाठीही काम करीत आहे, असे सिंह म्हणाले. अमेरिकेच्या ५० राज्यांत भारतीय कंपन्यांनी केलेली गुंतवणूक ही सरासरी ४४.३ अब्ज डॉलरची झाली आहे.
सिनेट इंडिया कॉकसचे सह अध्यक्ष
सिनेटर वॉर्नर म्हणाले की, अमेरिकेमध्ये वेगाने थेट विदेशी गुंतवणूक करीत असलेल्या देशांत भारत हा चौथा देश बनला आहे. या अहवालानुसार भारतीय कंपन्यांनी न्यू जर्सीमध्ये ९३००, कॅलिफोर्नियामध्ये ८४००, टेक्सास ६२००, इलिनॉईसमध्ये ४८०० आणि न्यूयॉर्कमध्ये ४१०० नोकऱ्या तयार केल्या आहेत. ही राज्ये भारतीय कंपन्यांकडून नोकऱ्या तयार करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.