याला म्हणतात नशीब! ...अन् एका झटक्यात ड्रायव्हर झाला करोडपती; मिळाले तब्बल 33 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:33 PM2022-12-24T17:33:36+5:302022-12-24T17:39:34+5:30
एका झटक्यात ड्रायव्हरचं नशीब पालटलं आहे. तो तब्बल 33 कोटींचा मालक झाला आहे.
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळे हे सांगता येच नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका झटक्यात ड्रायव्हरचं नशीब पालटलं आहे. तो तब्बल 33 कोटींचा मालक झाला आहे. भारतीय वंशाचा ड्रायव्हर अजय ओगुलासोबत ही घटना घडली. दुबईत राहणारा 31 वर्षीय अजय रातोरात करोडपती झाला आहे. त्याने एमिरेट्स ड्रॉमध्ये 33 कोटींचे बक्षीस जिंकले आहे. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर अजय ओगुला म्हणाला की, मी जॅकपॉट जिंकला आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.
अजयने सांगितले की, या रकमेतून तो चॅरिटी ट्रस्ट स्थापन करणार आहे. जेणेकरून त्याचे मूळ गाव आणि शेजारच्या गावांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करता येईल. खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, अजय ओगुला हा मूळचा दक्षिण भारतातील एका खेड्यातील असून चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आला होता. सध्या अजय एका ज्वेलरी फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो दर महिन्याला 72 हजार रुपये कमावतो. पण आता तो करोडपती झाला आहे.
अजयने सांगितले की, जेव्हा त्याने भारतातील आपल्या कुटुंबाला आपण करोडपती झाल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या आई आणि भावंडांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. पण मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर त्यांचा विश्वास बसला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. भारतीय वंशाचा अजय सांगतो की, त्याने पहिल्यांदा लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्याला फक्त आपलं नशीब आजमावायचं होतं. तो बक्षीस जिंकेल याची त्याला अजिबात खात्री नव्हती.
लॉटरी लागल्यानंतर त्याचा विश्वास बसेना. त्याच्या EASY6 ग्रँड प्राइजमध्ये 33 कोटी 70 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची लॉटरी लागली. अजयने सांगितले की त्याला वाटले की त्याने कमी रक्कम जिंकली असेल पण जेव्हा त्याने मेसेज वाचला तेव्हा शून्य कमी व्हायचं नाव घेत नव्हते. एवढी मोठी रक्कम जिंकली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"