भारतीय वाहन चालकाने जिंकला ३३ कोटींचा जॅकपॉट; बक्षिसाच्या रकमेतून करणार जनकल्याणाची कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 12:05 PM2022-12-25T12:05:53+5:302022-12-25T12:06:44+5:30

जॅकपॉटच्या रकमेतून एक ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे जनकल्याणाची कामे करण्याचा त्यांचा विचार आहे.

indian driver wins 33 crore jackpot public welfare works will be done from the prize money | भारतीय वाहन चालकाने जिंकला ३३ कोटींचा जॅकपॉट; बक्षिसाच्या रकमेतून करणार जनकल्याणाची कामे

भारतीय वाहन चालकाने जिंकला ३३ कोटींचा जॅकपॉट; बक्षिसाच्या रकमेतून करणार जनकल्याणाची कामे

googlenewsNext

दुबई :दुबईमध्ये वाहनचालकाचे काम करणाऱ्या अजय ओगुला (३१ वर्षे) या भारतीयवंशीय व्यक्तीने ३३ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे. इतकी मोठी रक्कम मिळाली आहे, या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाही, असे त्यांनी सांगितले. ते तेलंगणा राज्यातील मूळ रहिवासी असून, चार वर्षांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आले होते. जॅकपॉटच्या रकमेतून एक ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे जनकल्याणाची कामे करण्याचा त्यांचा विचार आहे.

अजय ओगुला सध्या दुबईतील एका ज्वेलरी कंपनीमध्ये वाहनचालकाचे काम करतात. त्यांना दरमहा ७२ हजार रुपये इतके वेतन मिळते. ३३ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकल्याची बातमी कळली तेव्हा त्यांना प्रथम त्यावर विश्वास बसला नाही. कोट्यवधी रुपयांच्या रकमेचे बक्षीस मिळणे, हा त्यांच्यासाठी सुखद धक्का होता. अजय ओगुला यांनी सांगितले की, जॅकपॉटमधून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांमधून मी एक ट्रस्ट स्थापन करणार आहे. तेलंगणा राज्यातील माझ्या व पंचक्रोशीतील गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे. लोकांना संकटांचा सामना करावा लागतो. मी स्थापन करणार असलेल्या ट्रस्टमधून जनकल्याणाची कामे करणार आहे. (वृत्तसंस्था)

कुटुंबीयांनाही सुखद धक्का

अजय ओगुला म्हणाले की, दुबईमध्ये मी जॅकपॉट जिंकल्याची बातमी कुटुंबीयांना सांगितली, तेव्हा त्यांचाही या गोष्टीवर आधी विश्वास बसला नाही. पण आता मात्र त्यांची खात्री पटली आहे. या पैशातून मी काही लोकांसाठी काही चांगली कामे करावी, असे माझ्या कुटुंबीयांचेही मत आहे. 

ब्रिटिश महिलेने जिंकले १ लाखाचे बक्षीस

अजय ओगुला यांच्यासोबतच पाॅल लिच या ब्रिटिश महिलेने १ लाख ७४ हजार रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे. त्या दुबईमध्ये एका कंपनीत एचआर विभागामध्ये अधिकारी आहेत. त्या गेली १४ वर्षे दुबईत राहत आहेत.

जॅकपॉट जिंकणाऱ्यांमध्ये भारतीय अधिक

- यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुबईतील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संजेश एन. एस. या भारतीय वंशाच्या व्यक्तीही एक रात्रीत करोडपती झाला होता. 
- त्यांना ५५ कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला होता. ते दुबईतील करामा भागातील इक्काईज रेस्टॉरंटमध्ये पर्चेस मॅनेजर म्हणून काम करतात. 
- आखाती देशांत अनेक भारतीयांनी आजवर जॅकपॉट जिंकले आहेत. त्यातील बहुतेक जण त्या देशांतील कंपन्यांमध्ये नोकरी करतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: indian driver wins 33 crore jackpot public welfare works will be done from the prize money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dubaiदुबई