भारतीय अभियंत्यांकडून दक्षिण सुदानमध्ये रस्त्यांची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 02:59 PM2017-12-01T14:59:13+5:302017-12-01T15:11:48+5:30
संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या रस्ते बांधकाम प्रकल्पाचे काम दक्षिण सुदानमध्ये सुरु झाले आहे. भारतीय अभियंते या कामासाठी मदत करत आहेत.
जुबा- संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या रस्ते बांधकाम प्रकल्पाचे काम दक्षिण सुदानमध्ये सुरु झाले आहे. भारतीय अभियंते या कामासाठी मदत करत आहेत. या रस्त्यामुळे दक्षिण सुदानमधील दोन शहरे जोडली जाणार आहेत. हा रस्ता 205 किमी लांबीचा आहे.
मालकल आणि मेलूत यांच्यामधील रस्त्याची दुरुस्ती आणि बांधकाम झाल्यामुळे मोटरचालक, स्थानिक व्यापारी यांसह संयुक्त राष्ट्राने मदतीसाठी पाठवलेल्या वाहनांना फायदा होणार असल्याचे स्थानिक गव्हर्नर जेम्स टॉर मुनीबनी यांनी या कामाचा शुभारंभ झाल्यावर सांगितले. युनायटेड नेशन मिशन्सचे दक्षिण सुदानमधील सुरु असणारे प्रयत्न शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहेत. या मोहिमेत भारताचे 2400 लोक काम करत आहेत.
#UNMISS Indian engineers launch project to repair and rehabilitate Malakal-Melut road #SouthSudan | https://t.co/zZH56kI2aKpic.twitter.com/IR6MEUo6BI
— UNMISS (@unmissmedia) November 30, 2017
अमेरिकेचा दक्षिण सुदानला कारवाईचा इशारा
दक्षिण सुदानमध्ये शांतताप्रक्रीया चालू राहण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना परवानगी देऊन सहकार्य करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा अमेरिकेने दक्षिण सुदानला दिला आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले यांनी दक्षिण सुदानला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर यांची राजधानी जुबामध्ये भेट घेतली होती. त्यानंतर सुरक्षा परिषदेत बोलताना 'केवळ आश्वासने चालणार नाहीत' असा इशारा त्यांनी दक्षिण सुदानला दिला आहे. डोनल्ड ट्रम्प यांच्या सरकारने सप्टेंबर महिन्यातच दक्षिण सुदानच्या काही अधिकाऱ्यांवर आणि माजी लष्करप्रमुखांवर बंधने लादली होती. या अधिकाऱ्यांचा यादवी युद्धात आणि नागरिकांवर हल्ले करण्यात सहभाग होता. अर्थात दक्षिण सुदानवर आता कोणत्याही प्रकारची बंधने संयुक्त राष्ट्रात घालता येणे अमेरिकेला शक्य होणार नाही कारण रशिया त्यांचा नकाराधिकार वापरुन बंधनांचा प्रस्ताव फेटाळू शकते. 2011 साली दक्षिण सुदान हा सुदानपासून वेगळा झाला. मात्र दोनच वर्षांमध्ये या देशात यादवी युद्ध भडकले. या युद्धामुळे एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश लोकांना घरे सोडून पळून जावे लागले.
(छायाचित्र- यूएनएमआयएसएस)