मुलगा रडत असल्याने भारतीय परिवाराला विमानातून उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 12:00 PM2018-08-09T12:00:46+5:302018-08-09T12:07:00+5:30
ब्रिटनमध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिवावर वर्णद्वेषी टिप्पणी
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्याला लंडनमध्ये त्याचे मुल रडत असल्याचा कारणावरून वर्णभेदी टिप्पणीसह घाणेरड्या शब्दांत बोलत विमानातून उतरवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या अधिकाऱ्याने मंत्रालयाकडे याची तक्रारही केली आहे.
संयुक्त सचिव पदावर असलेला हा अधिकारी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह ब्रिटिश एयरवेजच्या लंडन-बर्लिन या विमानातून प्रवास करत होता. तेव्हा त्यांचा मुलगा रडायला लागला. यावेळी या अधिकाऱ्याची पत्नी मुलाला शांत करत असताना विमानातील कर्मचाऱ्याने त्यांच्या जागेवर येत वर्णद्वेषी टिपण्णी केली. तसेच अभद्र भाषेमध्ये बोलत विमानातून उतरवल्याचा आरोप या अधिकाऱ्याने केला आहे. याचबरोबर मुलाला शांत करण्यासाठी मदत करणाऱ्या अन्य भारतीय प्रवाशांनाही खाली उतरविण्यात आले.
अधिकाऱ्याने या घटनेची तक्रार रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबरच उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. पत्रामध्ये या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मुलाला सीटबेल्ट बांधल्याने तो रडायला लागला. पत्नी त्याला समजावत होती. यावेळी काही कर्मचारी तेथे पोहोचले आणि मोठ्या आवाजात ओरडू लागले. यामुळे मुलगा आणखी घाबरला. दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी विमान रनवे वर असताना इतर सहकाऱ्यांना मेसेज करायला सुरुवात केली. तसेच मुलाला खिडकीतून बाहेर फेकण्याची धमकी दिली. याबरोबरच घाणेरड्या शब्दांत वर्णभेदी टिपण्णी केली.
दरम्यान, ब्रिटिश एयरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, अशा प्रकारच्या आरोपांना कंपनीने गंभीरतेने घेतले आहे. प्रवाशांसोबतचा दुर्व्यवहार कधीही सहन केला जाणार नाही. या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.