ब्रिटनमध्ये संपत्ती निर्मितीमध्ये भारतीय आघाडीवर, हिंदुजा बंधु पहिल्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 09:02 AM2017-05-08T09:02:54+5:302017-05-08T09:02:54+5:30
संडे टाइम्सने ब्रिटनमधील 1 हजार श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये 40 हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 8 - संडे टाइम्सने ब्रिटनमधील 2017 या वर्षातील 1 हजार श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये 40 हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. भारतीय वंशाचे हिंदुजा बंधु 16.2 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह सर्वोच्च स्थानी असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज पाऊंडनी वाढ झाली आहे. ब्रिटनमधल्या 134 अब्जाधीशांच्या एलिट ग्रुपमध्ये श्रीचंद (81) आणि गोपीचंद (77) हे हिंदुजा बंधु पहिल्या स्थानावर आहेत.
तेल, गॅस, आयटी,ऊर्जा, मीडिया, बँकिंग, प्रॉपर्टी आणि आरोग्य या क्षेत्रात हिंदुजा बंधुंनी मोठी गुंतवणूक केली आहे. मागच्यावर्षी हिंदुजा बंधु ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दुस-या स्थानावर होते. यावर्षी युक्रेनियन उद्योगपती लेन ब्लावाटनीक 15.9 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह दुस-या स्थानावर आहे.
भारतात जन्मलेले डेविड आणि सिमॉन बंधु मागच्यावर्षी पहिल्या स्थानावर होते. ते आता तिस-या स्थानावर गेले आहेत. त्यांच्याकडे 14 अब्ज पाऊंडची संपत्ती आहे. प्रसिद्ध स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल 13.2 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. जगात सर्वाधिक स्टीलची निर्मिती करणारे लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीमध्ये 6.1 अब्ज पाऊंडनी वाढ झाली आहे.
ब्रिटनच्या जनतेने मागच्यावर्षी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कौल दिला. ब्रेक्झिटच्या या निर्णयामुळे अब्जाधीशांच्या संपत्ती निर्मितीवर फारसा परिणाम झाला नसल्याचा निरीक्षण संडे टाइम्स रिच लिस्टने नोंदवले आहे.