'कॅनडा सरकारची निष्क्रियता दीर्घकाळापासून'; ट्रूडोंच्या आरोपावरुन भारत सरकारने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:07 AM2023-09-19T10:07:44+5:302023-09-19T10:55:40+5:30
भारत सरकारने ट्रुडो यांचे हे वक्तव्य फेटाळून लावले आहे.
नवी दिल्ली: कॅनडातील कुख्यात खलिस्तानी दहशतवादी आणि भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या हरदीप सिंह निज्जर याची १८ जून रोजी कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या मृत्यूनंतर काही महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जर यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. जस्टीन ट्रूडो म्हणाले की, देशाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येचा संबंध तपासत आहेत.
जस्टीन ट्रूडो संसदेत म्हणाले की, आज मला एका अत्यंत गंभीर विषयाची सभागृहाला जाणीव करून द्यायची आहे. मी थेट विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळवले आहे, पण आता मला सर्व कॅनेडियन लोकांना सांगायचे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संभाव्य कनेक्शनच्या विश्वसनीय आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत. कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा देश आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण मूलभूत आहे, असं ट्रूडो यांनी सांगितले.
आमच्या सुरक्षा एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींनी सर्व कॅनेडियन लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या हत्येतील दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. कॅनडाने हा मुद्दा भारत सरकारचे उच्च अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. गेल्या आठवड्यात, मी वैयक्तिकरित्या हा मुद्दा थेट पंतप्रधान मोदींसोबत जी२० मध्ये मांडला होता. आपल्याच भूमीवर कोणत्याही कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत परदेशी सरकारचा सहभाग म्हणजे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचं जस्टीन ट्रूडो यांनी म्हटलं आहे.
भारताने दिले जोरदार प्रत्युत्तर-
भारत सरकारने ट्रुडो यांचे हे वक्तव्य फेटाळून लावले आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप म्हणजे मूर्खपणा आहे. अशा निराधार आरोपांमुळे कॅनडात आश्रय देण्यात आलेल्या आणि भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे भारताने म्हटले आहे. या विषयावर कॅनडाच्या सरकारची निष्क्रियता ही दीर्घकाळापासून आणि सतत चिंतेची बाब आहे. कॅनडाच्या राजकीय व्यक्तींकडून अशा घटकांबद्दल सहानुभूती उघडपणे व्यक्त केलेली तीव्र चिंतेची बाब असल्याचं देखील भारताने म्हटलं आहे.
कोण होता हरदीप सिंग निज्जर?
निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो गेली अनेक वर्षे कॅनडात राहत होता आणि तेथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालत होता. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर गेल्या वर्षभरात भारतीय तपास यंत्रणांसाठी आणखी मोठी डोकेदुखी बनला होता कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती. २०२२ मध्ये पंजाबमधील जालंधर येथील भरसिंगपूर गावात एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) निज्जरवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यापूर्वी एनआयएने भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात निज्जरविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते.