भारतीय हॅकर्सनी केली पाक रेल्वेची वेबसाईट हॅक
By admin | Published: August 17, 2014 03:45 PM2014-08-17T15:45:48+5:302014-08-17T15:45:48+5:30
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त भारतातील हॅकर्सनी पाकिस्तान रेल्वेचे संकेतस्थळ हॅक केल्याची घटना समोर आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त भारतातील हॅकर्सनी पाकिस्तान रेल्वेचे संकेतस्थळ हॅक केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानचे हॅकर्स भारताच्या महत्त्वाच्या वेबसाईट हॅक करत असल्याने त्याचा बदला घेण्यासाठी आता ही वेबसाईट हॅक केल्याचे हॅकर्सनी वेबसाईटवर टाकलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये हॅकिंग युद्ध झाल्याचे दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी भारताने ६७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात असतानाच पाकिस्तान रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळावर भारताचा झेंडा आणि स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा असा संदेश झळकला व पाकिस्तानमध्ये खळबळ माजली. ब्लॅक ड्रॅगन इंडियन हॅकर्स ऑनलाइन स्क्वॉड' या ग्रुपने या हॅकींगची जबाबदारी स्वीकारली आहे. हॅकर्सनी पाक रेल्वेच्या संकेतस्थळावर एक संदेशही टाकला होता. ' पाकिस्तानच्या नागरिकांनो, ही वेबसाईट हॅक झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील काश्मीरमध्ये पाकिस्तानने रक्तरंजित कारवायांना पाठिंबा दिला. तसेच नेहमी भारतविरोधी भूमिकाच मांडली. भारतातील अनेक महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट्स पाककडून हॅक केल्या जातात' असे यात म्हटले होते. भारतीय लोक इस्लाम आणि मुस्लिमांचा आदर करतात पण पाकिस्तानविरोधात त्यांच्या मनात द्वेष आहे. वीज वितरण, बँकेच्या वेबसाईटही लवकरच हॅक केल्या जातील अशी धमकीही हॅकर्सनी दिली आहे. तसेच हॅकर्सनी भारताचा झेंडाही पाक रेल्वेच्या वेबसाईटवर टाकला होता.