लेबनॉननं इस्रायलच्या उत्तर भागात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू; दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:07 AM2024-03-06T11:07:43+5:302024-03-06T11:08:11+5:30
हमासच्या दहशतवाद्यांनी केवळ १२०० लोकांची हत्या केली नाही तर इस्रायल व अन्य देशांच्या महिलांवर बलात्कार केले व त्यांची हत्या केली.
जेरुसलेम : लेबनॉनमधून इस्रायलच्या उत्तर भागात करण्यात आलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे एका भारतीयाचा मृत्यू झाला तर आणखी दोन जण जखमी झाले. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
मरण पावलेला व्यक्ती व जखमी झालेले दोन जण केरळचे मूळ रहिवासी आहेत. लेबनॉनमधून सोमवारी डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने इस्रायलच्या गॅलील भागात सामुदायिक शेती असलेल्या परिसरातील वास्तूला लक्ष्य केले. त्यात केरळचे मूळ रहिवासी असलेल्या तीन जणांपैकी एक जण मरण पावला व दोन जण जखमी झाले. मृत व्यक्तीचे नाव पटनिबिन मॅक्सवेल असून, ते केरळमधील कोल्लमचे रहिवासी आहेत. तर बुश जोसेफ जॉर्ज, पॉल मेल्विन हे दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीयांनी सुरक्षितस्थळी जावे, असे आवाहन भारताने केले आहे.
हमासने महिलांवर केले सामुहिक बलात्कार
- हमासच्या दहशतवाद्यांनी केवळ १२०० लोकांची हत्या केली नाही तर इस्रायल व अन्य देशांच्या महिलांवर बलात्कार केले व त्यांची हत्या केली.
- संयुक्त राष्ट्रांनी युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच याला दुजोरा दिला. संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, इस्रायलमध्ये महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आले होते.