मुलाला डिस्नेलँडमध्ये फिरायला नेलं आणि केली हत्या; हॉटेलमध्ये सापडला ११ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:51 IST2025-03-23T13:47:29+5:302025-03-23T13:51:29+5:30
अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेने मुलाची गळा चिरुन हत्या केली.

मुलाला डिस्नेलँडमध्ये फिरायला नेलं आणि केली हत्या; हॉटेलमध्ये सापडला ११ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह
Crime News: अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या महिलेला तिच्या ११ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला कॅलिफोर्निया येथील डिस्नेलँडमध्ये आपल्या मुलासोबत फिरण्यासाठी गेली होती. डिस्नेलँडमध्ये तीन दिवस घालवल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये चाकूने मुलाचा गळा चिरला. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे गेल्याने महिला नाराज होती आणि त्यातूनच तिने हे धक्कादायक कृत्य केलं.
४८ वर्षीय सरिता रामराजूवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. सरिता रामराजू आपल्या मुलासोबत डिस्नेलँडमध्ये तीन दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्याचवेळी हॉटेलमध्ये सरिता ११ वर्षीय मुलाचा गळा चिरला. हत्येनंतर सरिताने स्वतः पोलिसांना फोन केला. मुलाची हत्या करुन आपण विष पिऊन आत्महत्या करत असल्याचे सरिताने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठलं. जिथे त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. काही तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विष प्यायल्याने सरिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
घटस्फोट घेतल्यानंतर २०१८ मध्ये सरिता रामराजू कॅलिफोर्नियातून निघून गेली होती. ती पती आणि मुलापासून वेगळी राहत होती. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात आला होता. तर सरिताला तिच्या मुलाला भेटण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे सरिता तिच्या मुलाला भेटण्यासाठी कॅलिफोर्नियात आली होती. गेल्या वर्षभरापासून मुलाच्या ताब्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. सरिताला मुलाने व्हर्जिनियामध्ये राहायला हवं असं वाटत होते. पती माझ्या संमतीशिवाय मुलाचे वैद्यकीय आणि शाळेशी संबंधित निर्णय घेत होता आणि माझ्यावर अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप सरिताने केला होता.
दरम्यान, सरिताने स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चाकूने आपल्या मुलाची हत्या केली. तो हॉटेलच्या खोलीत सापडला. खुनाच्या काही दिवसांपूर्वी सरिताने चाकू खरेदी केला होता. मुलाची हत्या करून सरिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता सरिता सर्व आरोपांमध्ये दोषी आढळल्यास, तिला २६ वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल, असं वकिलांनी सांगितले.