मालदीवमध्ये नेमणार भारतीय अधिकारी, आर्थिक गुन्ह्यांचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 03:48 AM2019-05-30T03:48:09+5:302019-05-30T03:48:17+5:30
आर्थिक गुन्हे आणि हवाला व्यवहाराच्या प्रकरणांविरुद्ध काम करण्यासाठी भारताने मालदीवमध्ये तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे आणि हवाला व्यवहाराच्या प्रकरणांविरुद्ध काम करण्यासाठी भारताने मालदीवमध्ये तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मालदीवमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी कायदा राबवणाºया, भ्रष्टाचारविरोधात आणि हवाला व्यवहारांविरुद्ध काम करणाºया स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी धोरणे तयार करतील, असे अधिकृत आदेशाचा हवाला देऊन अधिकाऱ्यांनी सांगितले. इंटरपोल, लंडन मेट्रोपोलिटन पोलीस आणि एफबीआय या इतर संस्थांकडून कार्यवाहीचा पाठिंबा कसा मिळवायचा याच्या पद्धती हे अधिकारी
सुचवतील.
आर्थिक गुन्हे, फसवणुकीची चौकशी, हवाला व्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पात्र अधिकाºयांची समिती केंद्र सरकार तयार करीत आहे, असे त्यांनी सांगितले. तज्ज्ञ अंतर्गत आणि बाहेरून मिळणाºया, समाजमाध्यमांतून, तसेच खुल्या स्रोतांद्वारे मिळणाºया माहितीचे अनौपचारिक विश्लेषण करून संबंधित नवी माहिती विकसित करतील, असे ते म्हणाले. हे अधिकारी गुंतागुंतीच्या प्रकरणांत खूप खोलात जाऊन विश्लेषण करण्यास साह्य करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मालदीवला भेट देण्याची अपेक्षा आहे.
>कायद्यात हवा पारंगत
या अधिकाºयांना नेमण्याच्या निकषाबद्दल आदेशात म्हटले आहे की, या तज्ज्ञांकडे संस्थेला मिळणाºया निधीचे स्रोत, संस्थेत पैशांचा झालेला वापर, गैरव्यवहार, हवाला व्यवहार, करचुकवेगिरी आणि मालमत्तेचा शोध घेणे, ई-मेल्स, दस्तावेज आणि छायाचित्रांची छाननी करून भ्रष्टाचाराला ओळखण्याचे कौशल्य अपेक्षित आहे. हा तज्ज्ञ हवाला व्यवहारविरोधी आणि दहशतवादविरोधी कायद्यांत, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेंस्ट करप्शन, ओईसीडी कन्व्हेन्शन आॅन कॉम्बॅटिंग ब्रायबरी आॅफ फॉरीन पब्लिक आॅफिशियल्स आणि इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन अगेंस्ट करप्शन आणि त्या भागातील अशा स्वरूपाच्या संघटनांच्या कायद्यांत पारंगत असला पाहिजे, असे तो म्हणाला. विदेशांत भारतीय अधिकाºयाची प्रतिनियुक्ती करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.