अभिमानास्पद! भारतीय वंशाचे श्रीनिवासन यांची अमेरिकेत मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 04:25 PM2020-02-20T16:25:39+5:302020-02-20T16:27:04+5:30
श्रीनिवासन यांचा जन्म चंदिगड येथे झाला होता. त्यांचे मुळगाव हे तामिळनाडूमध्ये आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील न्यायक्षेत्रात आघाडीचे नाव असलेले भारतीय वंशाचे कायदेतज्ज्ञ श्री श्रीनिवासन यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन यांची अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. 52 वर्षीय श्रीनिवासन यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती.
श्रीनिवासन हे अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेले पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयानंतर फेडरल सर्किट न्यायालय हे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायालय मानले जाते. दरम्यान, श्रीनिवासन यांनी याआधी कोलंबियातील फेडरल कोर्ट ऑफ अपील्सचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.
श्रीनिवासन यांचा जन्म चंदिगड येथे झाला होता. त्यांचे मुळगाव हे तामिळनाडूमध्ये आहे. श्रीनिवासन यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. श्रीनिवासन हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या विशेष मर्जीतील होते. 2013 मध्ये श्रीनिवासन यांची कोलंबियातील फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी श्रीनिवासन हे आपले आवडते न्यायाधीश असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे.