सुनीता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा अवकाशात झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:33 AM2024-06-06T06:33:51+5:302024-06-06T06:34:06+5:30
विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले.
ह्यूस्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला.
विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला.
२०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान विल्यम्स या अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण करणाऱ्या पहिल्या व्यक्ती बनली होत्या. अमेरिकी नौदल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर विल्यम्स मे १९८७ मध्ये अमेरिकी नौदलात सामील झाल्या. विल्यम्स यांची १९९८ मध्ये ‘नासा’द्वारे अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती आणि त्या २००६ मध्ये मिशन १४/१५ आणि २०१२ मध्ये ३२/३३ या दोन अंतराळ मोहिमांचा भाग होत्या. त्यांनी मोहीम-३२ मध्ये फ्लाइट इंजिनिअर आणि नंतर मोहीम-३३ च्या कमांडर म्हणून काम केले. विल्यम्स आणि विल्मोर यांच्या या अंतराळ प्रवासाला २५ तास लागतील अशी अपेक्षा आहे.