९० सेकंदात २९ किचकट स्पेलिंग्ज करेक्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 08:50 AM2024-06-03T08:50:14+5:302024-06-03T08:51:41+5:30
फ्लोरिडा राज्यातील टॅम्पा शहरातल्या एका शाळेत १२ वर्षाचा बृहत सातवीत शिकतो.
स्क्रिप्स स्पर्धेत भाग घेईपर्यंत, डिक्शनरी, स्पर्धक विद्यार्थी, अंतिम फेरी यापैकी कुणीही बृहतला विजयापासून रोखलेले नव्हते. अंतिम सामन्यात बृहतने २९ शब्दांची स्पेलिंग्ज अचूक लिहीत अमेरिकेतली ९६ वी स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली. भारतीय वंशाच्या बृहतने केलेली ही कामगिरी म्हणूनच भारतीय आणि अमेरिकन नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. फैजन झाकी उपविजेता ठरला. ९ स्पेलिंग्जने तो बृहतच्या मागे पडला. बृहतला ट्रॉफी, ५० हजार डॉलर आणि इतर अनेक बक्षिसे मिळाली.
फ्लोरिडा राज्यातील टॅम्पा शहरातल्या एका शाळेत १२ वर्षाचा बृहत सातवीत शिकतो. तो भारतीय वंशाचा असून लहानपणापासून बुद्धिमान आहे. त्याची स्मरणशक्ती तीव्र आहे. यापूर्वी त्याने कंसेक्युटिव्ह बी ही स्पर्धा तीनवेळा जिंकली होती. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमधली अत्यंत मानाची समजली जाणारी स्पर्धा देण्यासाठी तो सज्ज झाला. बृहत म्हणाला की, ‘मला जिंकायचं होतंच. ते माझं मुख्य ध्येयही होतं. बाकीच्या स्पर्धा नाही जिंकल्या तरी हरकत नाही पण या स्पर्धेत भाग घेणं, ती जिंकणं हे माझं ध्येय होतं, स्वप्न होतं. त्यामुळे ही स्पर्धा जिकल्याने मी खूप आनंदी आणि समाधानी आहे.’
९६ वी स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकल्यानंतर तो आणि त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या स्पर्धेत त्याने इतर सातही फायनलिस्टला पराभूत केले आणि बीच्या दुसऱ्या स्पेल-ऑफमध्ये त्याच्या अंतिम प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. बृहतने त्या स्पेलऑफमध्ये फक्त नव्वद सेकंदात तीसपैकी २९ शब्दांची स्पेलिंग्ज बरोबर लिहिली होती, तर टेक्सासच्या १२ वर्षीय फैजान झाकीने २० शब्दांची स्पेलिंग्ज बरोबर लिहिली. बृहतला यावर्षीचा चॅम्पियन घोषित करण्यात आले. स्पेलिंग बीच्या नियमांनुसार स्पेल-ऑफही झाला. स्पर्धेचा ठरावीक वेळ ओलांडल्यानंतर आणि एकापेक्षा जास्त स्पर्धक शिल्लक असताना चॅम्पियन निश्चित करण्यासाठी सक्रिय केलेल्या विशेष फेऱ्या म्हणजे स्पेल-ऑफ. स्पेल-ऑफमध्ये, ९० सेकंदात सर्वाधिक शब्द अचूकपणे लिहिणारा स्पर्धक जिंकतो.
“जेव्हा पहिल्यांदा स्पेल-ऑफ जाहीर केला तेव्हा माझं हृदय खूप वेगाने धडधडत होतं, पण तेही नंतर मला जाणवलं. कारण मी सहा महिने स्पेल-ऑफचा सराव करत होतो. मला जाणवलं, की टेन्शन आलं, तरी हे मला जमेल... आणि खरंच जमलं!”
स्टेजवर हातात विजयाची ट्रॉफी आली, तेव्हा हा मुलगा आनंदाने अक्षरश: थरथरत होता. बृहतने इंड्युमेंटम, डेहन्स्टुफ, ओकविक आणि हूफडॉर्पचे अचूक स्पेलिंग केले आणि ‘साइन क्वा नॉन’ ची अचूक व्याख्याही केली. स्टेजवर असताना प्रत्येक अक्षरासाठी योग्य की दाबून पॅन्टोमाइम करून शब्द ‘टाइप’ करण्याची बृहतची पद्धत अनेकांच्या लक्षात आली. बृहत म्हणतो, स्पेलिंग सराव वेबसाइटवर शब्द टाइप करण्याच्या सरावातून हे जमतं. मीही तेच केलं!
बृहतला चॅम्पियनचा मुकुट देणारा शब्द होता : abseil. बृहत शनिवार व रविवार १० तास सराव आणि आठवड्याच्या दिवशी सहा तास सराव करत होता. या आठवड्यात या वर्षीच्या स्पेलिंग बीमध्ये २४० हून अधिक स्पेलर्सनी भाग घेतला आणि आठ जणांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक, उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीनंतर, नॅशनल हार्बर, मेरीलँड येथील गेलॉर्ड नॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे अंतिम फेरीला सुरुवात झाली. या वर्षीच्या स्पर्धेच्या सुरुवातीला अमेरिकेच्या फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांचा एक व्हिडिओ संदेशदेखील दाखवला गेला. मी शाळेत असताना स्पेलिंग बी स्पर्धा खेळलेली आहे, असं डॉ. जिल बायडेन सांगत होत्या.
बृहतने यापूर्वी स्पेलिंग बी मध्ये २०२२ मध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा तो तब्बल १६३ व्या स्थानावर आला. २०२३ मध्ये याच स्पर्धेत तो ७४ व्या स्थानावर होता. स्पर्धेच्या वेबसाइटवर त्याच्या या वाटचालीची नोंद आहे. बृहतला बॅडमिंटन, पिंग-पाँग आणि बास्केटबॉल खेळायला आवडते आणि त्याचा आवडता खेळाडू लेब्रॉन जेम्स आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व अंतिम स्पर्धकांना आर्थिक बक्षीस आणि इतर भत्ते मिळतात, तर विजेत्याला ५० हजार डॉलर रोख, अधिकृत ट्रॉफी शिवाय अनेक महत्त्वाचे शब्दकोशही भेट म्हणून मिळतात.
अनिवासी भारतीयांचा दबदबा
अमेरिकन शालेय जीवनात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धा देशभरात चर्चेचा विषय असते. गेली अनेक वर्षं या स्पर्धेवर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या भारतीयांच्या मुलांनी वर्चस्व गाजवलेलं आहे. याहीवर्षी श्रेय पारीख आणि अनन्या प्रसन्न ही तिसऱ्या स्थानी आलेली दोन्ही मुलं भारतीयच आहेत! भारतीय वंशाची मुलंच या स्पर्धेत कायम अग्रस्थानी का असतात याविषयी सगळ्या जगालाच अचंबा आहे.