दुबईत भारतीय वंशाच्या शेफनं ट्विटमधून हिंदू दहशतवादावर घेतला आक्षेप, सोशल मीडियावर झाले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 07:57 PM2018-06-12T19:57:14+5:302018-06-12T19:57:14+5:30
दुबईतल्या एका प्रसिद्ध भारतीय रेस्टारंटच्या मुख्य शेफनं इस्लामविरोधी ट्विट केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
युएई- दुबईतल्या एका प्रसिद्ध भारतीय रेस्टारंटच्या मुख्य शेफनं इस्लामविरोधी ट्विट केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जेडब्ल्यू मेरियट मार्किस हॉटेलचे शेफ अतुल कोचर यांनी क्वांटिको मालिकेच्या एका भागावरून अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निशाणा साधला आहे. या भागात हिंदू राष्ट्रभक्तांना दहशतवादी संबोधण्यात आलं आहे.
कोचर ट्विटमध्ये लिहितात, हे फारच दुखदायक आहे. गेल्या 2000 वर्षांपासून इस्लाममधून दहशतवादी निर्माण होत असताना हिंदूंना दहशतवादी संबोधून त्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कोचर यांच्या ट्विटवर नेटकरी अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर ते ट्विट डिलीट करत कोचर यांनी माफीसुद्धा मागितली.
कोचर म्हणाले, माझ्या टि्वटची मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी माझी चूक कबूल करतो. इस्लामची सुरुवात 1400 वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. मी इस्लामविरोधी नाही. मला माझ्या विधानांवर खेद आहे. जेडब्ल्यू मेरियट हॉटेलनं शेफच्या विधानांपासून हात झटकले आहेत. हॉटेलकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शेफ अतुल कोचर यांच्या विधानांची आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही त्यांच्या विधानांचं समर्थन करत नाही. आमचं हॉटेल सर्वसमावेशक असून, विविध संस्कृतीच्या प्रतीकाचा हॉटेलला गर्व आहे. शेफच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटक-यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
There is no justification for my tweet, a major error made in the heat of the moment on Sunday. I fully recognise my inaccuracies that Islam was founded around 1,400 years ago and I sincerely apologise. I am not Islamophobic, I deeply regret my comments that have offended many.
— Atul Kochhar (@atulkochhar) June 11, 2018
अनेकांनी शेफला कामावरून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. एका यूझर्सनं शेफवर टीका करत म्हटलं आहे की, त्यांचं विधान हे हॉटेलच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. अशा व्यक्तीला हॉटेलमध्ये कसं काम करू दिलं जाऊ शकतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ संपवलं पाहिजे. तर अरब पत्रकारानंही शेफवर टीका केली आहे. कोचर यांनी मला दुखावलं आहे. एक व्यक्ती म्हणून मला भारत आणि तिकडचे लोक आवडतात. एक धर्मनिरपेक्ष आणि उदार व्यक्तीच्या रुपातील एक भयानक विधान आहे.