डिस्नीच्या ३-डी ‘जंंगल बुक’मध्ये भारतीय वंशाचा ‘मोगली’
By Admin | Published: July 18, 2014 01:45 AM2014-07-18T01:45:53+5:302014-07-18T01:45:53+5:30
वॉल्ट डिस्नी फिल्मस् ही हॉलीवूडमधील विख्यात कंपनी रिडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या कथानकावर एक ३-डी चित्रपट काढणार
वॉशिंग्टन : वॉल्ट डिस्नी फिल्मस् ही हॉलीवूडमधील विख्यात कंपनी रिडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’ या कथानकावर एक ३-डी चित्रपट काढणार असून त्यातील ‘मोगली’ या प्रमुख व एकमेव मानवी पात्राची भूमिका करण्यासाठी नील सेठी या १० वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलाची निवड करण्यात आली आहे.
मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किपलिंग यांचा ‘जंगल बुक’ हा जंगलकथांचा संग्रह १२० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यावर आधारित झोल्तान कोर्डा यांनी काढलेला त्याच नावाचा माहितीपट जगप्रसिद्ध असून गेल्या किमान दोन पिढ्यांच्या हृदयावर त्यातील पात्रे कोरली गेलेली आहेत. आता डिस्नी कंपनीकडून तयार केला जात असलेला ‘जंगल बुक’ हा त्याचाच पूर्ण लांबीच्या स्वरूपातील ३-डी चित्रपट असेल.
मोगलीच्या भूमिकेसाठी हजारो इच्छुकांच्या ‘आॅडिशन्स’ घेण्यात आल्या व त्यातून नील सेठी या न्यूयॉर्कमधील १० वर्षांच्या भारतीय-अमेरिकन मुलाची निवड करण्यात आली आहे. नीलचे अभिनयाच्या क्षेत्रातील हे पदार्पण असेल, असे डिस्नी कंपनीने त्यांच्या ब्लॉगवर जाहीर केले.याआधी ‘आयर्न मॅन’, ‘काऊबॉईज’ आणि ‘एलियन्स’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले व सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या ‘शेफ’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका वठविणारे डॉन फावेऱ्यू हेच ‘जंगल बुक’चेही दिग्दर्शन करणार आहेत. नील सेठीच्या निवडीविषयी त्यांनी ब्लॉगवर म्हटले की, कोणत्याही चित्रपटामध्ये पात्रनिवड ही अत्यंत महत्त्वाची असते व त्याच दृष्टीने मोगलीच्या भूमिकेसाठी सुयोग्य अशा बाल अभिनेत्याची निवड होणे गरजेचे होते. नीलकडे प्रचंड प्रतिभा आणि करिश्मा आहे. त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे व तो ती समर्थपणे पेलू शकेल याची मला खात्री आहे. त्याच ब्लॉगवर डिस्नीच्या कास्टिंग डायरेक्टर सारा फिन यांनी म्हटले की, मोगलीच्या पात्रातील आत्मा, विनोद व धैर्य यांचे नील सेठी हे मूर्तिमंत रूप असल्याचे मला वाटते. तो प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचा असून त्याची बुद्धिमत्ता वयाच्या तुलनेत खूपच प्रगल्भ आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता ठाम राहण्याच्या त्याच्या अंगभूत वृत्तीने आम्हा सर्वांना प्रभावित केले आहे.
नीलकडे अभिनयाचा व्यावसायिक अनुभव बिलकूल नसला तरी त्याच्यातील उपजत करिश्मा व नैसर्गिक सहजतेने आम्हाला जिंकून घेतले, असेही सारा फिन यांनी नमूद केले. ‘जंगल बुक’ हा चित्रपट सजीव अभिनय आणि अॅनिमेशन यांचे मिश्रण असेल व हा चित्रपट ९ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रदर्शित होईल. (वृत्तंसस्था)