भारतीयाचा डंका; अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:25 PM2020-03-21T13:25:49+5:302020-03-21T13:32:37+5:30
सध्या कोरोना व्हायरसविरोधात लढायचे असून अमेरिकी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही करण्यास तयार आहे. corona virus
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकीसिनेटचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी इलिनॉय प्रांतातून डेमोक्रेटीक पक्षातर्फे प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. त्यांनी तब्बल ८० टक्के मते मिळवत विजय मिळविला आहे. यामुळे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेंझेंटेटिव्हसाठी त्यांची उमेदवारी पक्की झाली आहे.
कृष्णमूर्ती यांच्या विरोधात त्यांचे जवळचे सहकारी विलियम ओल्सन हे उभे होते. त्याना केवल १३ टक्केच मते मिळाली आहेत. कृष्णमूर्ती यांनी विजयानंतर समर्थकांना पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, दुसऱ्यांना निवडणूक जिंकल्यानंतर मी अमेरिकी काँग्रेसमध्ये तुमचे मुद्दे मांडणार आहे. सध्या कोरोना व्हायरसविरोधात लढायचे असून अमेरिकी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही करण्यास तयार आहे. हेच माझे पहिले लक्ष्य असणार आहे.
या विजयमुळे कृष्णमूर्ती सलग तिसऱ्यांदा संसदीय निवडणूक लढवित आहेत. दरम्यान, रिपब्लिक पक्षाची १७ मार्चला होणारी निवडणूक कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे,
कोण आहेत कृष्णमूर्ती?
राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म १९ जुलै १९७३ मध्ये नवी दिल्लीमध्ये झाला होता. ते तीन महिन्यांचे असतानाच त्यांचे आई-वडील अमेरिकेला स्थायिक झाले. राजा कृष्णमूर्ती हे २००४ आणि २००८ मधील निवडणुकांवेळी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सल्लागार राहिलेले आहेत. कृष्णमूर्ती हे पेशाने वकील आणि अभियंता आहेत. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना ५७ टक्के मतदान झाले होते. त्यांचे विरोधक सीनेटर न्यूलँड यांना २९आणि देब बुलविंकेल यांना १३ टक्के मते मिळाली होती. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांच्यावर अमेरिकी काँग्रेसमध्ये आणलेल्या महाभियोगावर त्यांनी पक्षाची जोरदार बाजू मांडली होती. यामुळे ते चर्चेत आले होते.
ट्रम्प यांचा विजय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा आणि इलिनॉय येथील प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. याचबरोबर त्यांच्या पारड्यात १२७६ डेलिगेट्स झाले आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या विजयामुळे ट्रम्प यांची उमेदवारी रिपब्लिकन पक्षाकडून निश्चित मानली जात आहे.
ट्रम्प यांच्या विजयानंतर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख रोना मॅकडॅनिअल यांनी ट्विट करून ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पक्षाकडून अधिकृत उमेदवार बनल्याबद्दल अभिनंदनही केले आहे. दोन्ही ठिकाणी ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यासाठी झगडावे लागले नाही.