ब्रिटन सरकार पुन्हा कोसळणार? पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:43 AM2022-10-18T10:43:53+5:302022-10-18T10:45:02+5:30

ऋषी सुनक यांना संधीची शक्यता

Indian origin Rishi Sunak to finally fulfill his PM dream Rebel group plots major shakeup in UK against Liz Truss | ब्रिटन सरकार पुन्हा कोसळणार? पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता

ब्रिटन सरकार पुन्हा कोसळणार? पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता

googlenewsNext

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जवळपास ४० दिवसांतच लिझ ट्रूस यांची खुर्ची धोक्यात आली आहे. पक्षांतर्गत बंडखोरांचा आवाज तीव्र झाला असून ट्रूस यांना २४ ऑक्टोबरला पंतप्रधान पदावरून हटवले जाऊ शकते. त्यांच्याविरोधात पक्षाचे १०० सदस्य लवकरच अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. सत्ताधारी हुजूर पक्षाचे  (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाचे खासदार आज ट्रूस यांचे पंतप्रधान म्हणून भवितव्य ठरवण्यासाठी बैठक घेणार आहेत. दरम्यान,नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा दावा अधिक भक्कम झाला आहे. सुनक हे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात,असा विश्वास देशातील बुकींनाही वाटतो आहे.

पक्षाला वेगाने नेतृत्व बदलण्याची गरज आहे. ट्रूस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा असे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे. ट्रूस या पंतप्रधान म्हणून लोकांमध्ये आपली छाप सोडू शकल्या नाहीत, असा दावा त्यांचेच खासदार करीत आहे.  सरकारचा ‘मिनी’ अर्थसंकल्प सरकारलाच अडचणीचा ठरला आहे. त्यातून अर्थमंत्री क्वासी यांच्या हाकलपट्टीने जनतेमध्ये आणखी चुकीचा संदेश गेला आहे. 

सट्टा बाजार सुनक यांच्या बाजूने
सट्टा बाजारानेही ट्रूस सरकार कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकार पडल्यास सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असे सट्टेबाजांचे मत आहे. सुनक हे सर्वांच्या पसंतीचे ठरत आहेत.

वादग्रस्त कर कपात घेतली मागे
ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सोमवारी सर्व वादग्रस्त कर कपात मागे घेण्याची घोषणा केली. हंट यांची ही घोषणा ब्रिटनच्या ‘आर्थिक स्थिरते’बद्दल बाजारपेठांना आश्वस्त करण्याचा आणि ‘मिनी बजेट’मुळे बसलेला झटका कमी करण्याचा एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

संकटातून कोण बाहेर काढणार?
सुनक यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांचे म्हणणे आहे की, केवळ तेच ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतील,तर एका सर्वेक्षणानुसार ६२ टक्के नागरिकांचे मत आहे की ट्रूस या पंतप्रधान म्हणून पक्षाची चुकीची निवड आहे.  सुनक यांना १३७ खासदारांचा पाठिंबा आहे.

Web Title: Indian origin Rishi Sunak to finally fulfill his PM dream Rebel group plots major shakeup in UK against Liz Truss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.