कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 01:18 PM2024-09-17T13:18:10+5:302024-09-17T13:24:48+5:30
विद्यार्थी टोरंटो येथील तलावाच्या काठावर वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेला असताना ही धक्कादायक घटना घडली
कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. विद्यार्थी टोरंटो येथील तलावाच्या काठावर वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेला असताना ही धक्कादायक घटना घडली. हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ए प्रणित या विद्यार्थ्याने नुकतेच पीजीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो कॅनडामध्ये नोकरीच्या शोधात होता. मृतांच्या कुटुंबीयांनी मृतदेह भारतात पाठवण्याची विनंती केली आहे.
ए प्रणित नावाच्या विद्यार्थ्याचा कॅनडामध्ये मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रविवारी मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत असताना टोरंटो येथील तलावात प्रणितचा बुडून मृत्यू झाला. प्रणित हा रंगा रेड्डी जिल्ह्यातील मीरपेटचा मूळ रहिवासी होता. प्रणित रविवारी मित्र आणि भावासोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी कॅनडातील क्लियर लेकजवळील एका कॉटेजमध्ये गेला होता. वडील ए रवी यांच्या म्हणण्यानुसार, प्रणित रविवारी सकाळी मित्र आणि भावासोबत पोहायला गेला होता, मात्र तलावाच्या किनाऱ्यावर परतला नाही.
वडिलांनी सांगितले की, या घटनेनंतर स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली, परंतु बचाव पथकाला तलावापर्यंत पोहोचण्यास १० तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यानंतर तलावात शोध सुरू करण्यात आला आणि सायंकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही बातमी सोमवारी प्रणितच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. हे कुटुंब प्रणितच्या कॅनडातील मित्रांच्या संपर्कात आहे, जे स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. प्रणितचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीची मागणी कुटुंबीयांनी सरकारकडे केली आहे.
प्रणितच्या वडिलांनी दु:ख व्यक्त करताना सांगितलं की, मुलाच्या वाढदिवशीच ही घटना घडली. प्रणितचा मृतदेह हैदराबादला आणण्याची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी कुटुंबीय मदत मागत आहेत. प्रणित २०१९ मध्ये कॅनडाला शिक्षणासाठी गेला होता, त्यानंतर त्याचा मोठा भाऊ २०२२ मध्ये कॅनडाला गेला होता.