अमेरिकेत भारतीयाचा ८० लाख डॉलर्सचा रोबोकॉल घोटाळा, गुन्हा केला कबूल; १४ मे रोजी शिक्षा सुनावण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 02:57 AM2021-01-17T02:57:47+5:302021-01-17T07:11:46+5:30
न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते.
वॉशिंग्टन : ८० लाख डॉलर्सच्या रोबोकॉल घोटाळ्याचा कट रचल्याची तसेच ओळख बदलून लोकांकडून पैसे उकळल्याची एका भारतीय नागरिकाने कबुली दिली आहे, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. या घोटाळ्यात अमेरिकेच्या हजारो लोकांची फसवणूक झाली होती व यात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते. या कॉलमार्फत पठाण व त्याचे साथीदार लोकांमधून मोठी रक्कम उकळत होते. लोकांना विविध योजनांच्या जाळ्यात फसवून पैसे पाठविण्यासाठी राजी करण्यात येत होते. अनेकदा तर ते एफबीआय किंवा अन्य सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवून पैसे देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होते.
लोकांकडून येणारी रक्कम गोळा करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक राज्यांत पठाणचे लोक काम करीत होते. अशा प्रकारे त्याने अमेरिकेत ५,००० पेक्षा जास्त लोकांची ८० लाख डॉलर्सची फसवणूक केली. त्याला १४ मे रोजी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. त्याला २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कैदेची शिक्षा सुनावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.