इलेक्ट्रॉनिक बंदीचा भारतीयांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:42 AM2017-03-24T00:42:41+5:302017-03-24T00:42:41+5:30
भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या दर दोन प्रवाशांपैकी एक प्रवासी दुबई, अबुधाबी, दोहा या मध्य पूर्वेतील शहरातून जातो.
मुंबई : भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या दर दोन प्रवाशांपैकी एक प्रवासी दुबई, अबुधाबी, दोहा या मध्य पूर्वेतील शहरातून जातो. अशा भारतीय प्रवाशांना आता अमेरिकेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व उपकरण बंदीला तोंड द्यावे लागणार आहे. अमेरिकेने आठ मुस्लीमबहुल देशांच्या प्रवाशांना विमानातून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास बंदी घातली आहे.
ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आठ मुस्लीमबहुल देशांतील नागरिक अमेरिकेत विमानातून लॅपटॉप, टॅबलेट, कॅमेरा, ई-रिडर्स, इलेक्ट्रॉनिक गेम्स यांसारख्या वस्तू घेऊन जाऊ शकणार नाहीत. अम्मान (जॉर्डन), काहिरा (इजिप्त), इस्तंबुल (तुर्कस्तात), जेद्दा व रियाद (सौदी अरब), कुवेत, दोहा (कतार), दुबई आणि अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) या विमानतळांचा बंदीमध्ये समावेश आहे. येथून जाणाऱ्या प्रवाशांजवळ अशा उपकरणांसाठी त्यांना त्यांच्या मूळ विमानतळावर ‘चेक इन’ करून घ्यावे लागेल. एखादा प्रवासी मुंबई-दुबईमार्गे डल्लासला जात असेल तर त्याला मुंबईतच बॅगचे ‘चेक इन’ करावे लागेल. एअर इंडियाच्या प्रवाशांना हे उपाय लागू नसतील. पण, अमेरिकेने उल्लेख केलेल्या विमानतळावरून उड्डाण होत असेल तर प्रवाशांना हे नियम लागू असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)