भारतीय संशोधकामुळे फोक्सवॅगन जाळ्यात
By admin | Published: September 24, 2015 01:13 AM2015-09-24T01:13:26+5:302015-09-24T01:13:26+5:30
प्रदूषण नियंत्रण चाचण्यांचे निष्कर्ष फसवे येतील अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बसवून गेल्या पाच वर्षांत जगभरात एक कोटीहून अधिक सदोष डिझेल मोटारी विकण्याची फोक्सवॅगन
बर्लिन: प्रदूषण नियंत्रण चाचण्यांचे निष्कर्ष फसवे येतील अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बसवून गेल्या पाच वर्षांत जगभरात एक कोटीहून अधिक सदोष डिझेल मोटारी विकण्याची फोक्सवॅगन या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या दिग्गज जर्मन कंपनीची लबाडी उघड होण्यास अमेरिकेतील एका भारतीय अभियंत्याने केलेले मोलाचे संशोधन कारणीभूत ठरले आहे.
मोटार उद्योगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अशा या लबाडीने फोक्सवॅगनची व्यापारी इभ्रत पार धुळीला मिळाली असून अमेरिकेत ७.३ अब्ज डॉलरच्या (४८ हजार कोटी रु.) संभाव्य दंडाची टांगती तलवार कंपनीच्या डोक्यावर लोंबू लागली आहे. रिलायन्स इन्डस्ट्रिज या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीच्या वार्षिक नफ्याच्या दुप्पट एवढा हा दंड आहे यावरून या घोटाळ््याचे गांभीर्य लक्षात यावे.
अमेरिकेच्या संघीय प्रदूषण नियंत्रण संस्थेने ज्या आधारे फोक्सवॅगनला जाळ््यात पकडले ते संशोधन वेस्ट व्हजिर्निया विद्यापीठाच्या ‘सेटर फॉर अल्टरनेटिव्ह फ्युएल्स, इंजिन्स अॅण्ड इमिशन्स’ (कॅफी)मध्ये दोन वर्षांपूर्वी केले गेले होते. हे संशोधन करणाऱ्या तिघांच्या चमुमध्ये ३२ वर्षांच्या अरविंद थिरुवेंगदम यांचा समावेश आहे.
मद्रास विद्यापीठातून
मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर ते सध्या या विद्यापीठात एमएस आणि पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत. त्यांच्यासोबत संशोधन चमूत डॅनियल कार्डेर व मार्क बेश हे इतर दोन अभियंते होते. त्यांचे पीएचडीसाठीचे गाईडही मृदुल गौतम हेही भारतीयच आहेत. २५ वर्षांपूर्वी दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतलेले नेवादा विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
थिरुवेंगदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयोगशाळेत संशोधन करताना फोक्सवॅगनच्या जेट्टा व पस्सॅट या दोन मॉडेलच्या मोटारी घेतल्या होत्या, पण त्यावेळी कंपनीची लबाडी उघड करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. प्रयोगशाळेत संशोधन करतानाच्या चाचण्यांमध्ये या मोटारींच्या प्रदूषकांची पातळी जेवढी आढळली त्याहून २५ ते ३० पट अधिक प्रदूषण या मोटारी प्रत्यक्ष रस्त्यावर धावताना होत असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले. यावरून या मोटारींमध्ये चाचण्यांचे निष्कर्ष फसवे येतील अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बेमालूमपणे बसविलेले असावे, असा या संशोधक त्रिकूटाने कयास केला.
सीईओंचा राजीनामा
या घोटाळ्याचे वादळ जगभर घोंगावत असतानाच फोक्सवॅगन कंपनीचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन विंटरकॉर्न
यांनी बुधवारी राजीनामा दिला. एका निवेदनात विंटरकॉर्न यांनी म्हटले
की, गेल्या काही दिवसांतील घटनांनी मी हादरून गेलो आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील गैरवर्तन फोक्सवॅगन समुहात होऊ शकते, याने मी सुन्न झालो आहे. फोक्सवॅगनने नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे व ते शक्य व्हावे यासाठी मी राजीनामा देत आहे.
सरकारचे लक्ष-गडकरी
फोक्सवॅगन कंपनीने प्रदूषण लपविण्यासाठी केलेल्या लबाडीवर सरकारची नजर आहे. तथापि, त्याची काळजी करावी, असे काही नाही, असे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. गरज पडल्यास त्या प्रकरणी योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्या संदर्भातील अहवालाची प्रतीक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)