सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:51 PM2024-05-14T16:51:43+5:302024-05-14T17:14:47+5:30
Israel Hamas War : इस्रायल हमास युद्धात भारतीय सैन्यदलातील माजी अधिकाऱ्याचा बळी गेला आहे. सोमवारी झालेल्या या हल्ल्याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
Ex-Indian Army Officer Vaibhav Kale : गेल्या सात महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध धुमसतं आहे. काही दिवासांपूर्वीच रफाह सीमेजवळी गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर इस्रायली सैन्याने हल्ला केला होता. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील हे भयंकर युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला यश येताना दिसत नाही. अशातच एका भारतीयाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही व्यक्ती भारतीय सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण गाझामधील रफाह शहरातील खान युनिस परिसरात झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्राचा एक कर्मचारी ठार झाला तर दुसरा जखमी झाला होता. मृत पावलेली व्यक्ती भारतीय असल्याचे समोर आलं आहे. खान युनूस भागातील रुग्णालयामध्ये वाहनातून जाताना मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकाचे नाव माजी लष्करी जवान अनिल वैभव काळे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी सोमवारी रात्री एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
वैभव अनिल काळे हे महिन्याभरापूर्वीच गाझा येथील युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले होते. वैभव काळे हे त्यांच्या सहकाऱ्यासह संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनातून रफाह येथील रुग्णालयात जात होते. हल्ल्याच्या दिवशी वैभव काळे हे युनायटेड नेशन्सचे स्टिकर लावलेल्या कारमधून प्रवास करत होते. तसेच त्यांच्या गाडीवर संयुक्त राष्ट्राचा झेंडाही लावण्यात आला होता. मात्र असे असलं तरी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काळे यांना जीव गमवावा लागला.
वैभव काळे यांनी २०२२ मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि काळे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही गुटेरेस यांनी केली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोकसंदेशही पाठवला आहे. वैभव काळे हे इतर कर्मचाऱ्यासोबत ज्या वाहनातून प्रवास करत होते त्यावर कोणी गोळीबार केला याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनाही नाही. मात्र गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीयाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत एकूण १९० मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मरण पावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पॅलेस्टिनी नागरिक आहेत. पण अनिल काळे हे गाझामध्ये गोळीबारात मृत्युमुखी पडलेले संयुक्त राष्ट्राचे पहिले परदेशी कर्मचारी आहेत. दुसरीकडे, इस्रायलच्या लष्करानेही यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. हा हल्ला सोमवारी रफाह भागात झाला आणि या गोळीबाराची आणि संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत, असे इस्रायलने म्हटलं आहे.