लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांचा तीव्र विरोध; शेकडो भारतीय एकवटले, 'जय हिंद'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:08 PM2023-03-21T21:08:53+5:302023-03-21T21:09:41+5:30
रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी हल्ला करत तिरंगा हटवला होता.
रविवारी लंडनमधीलभारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर तेथील भारतीय एकवटले आहेत. आज(मंगळवार) शेकडो भारतीय नागरिक (शिखांसह) भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमले आणि एकतेचा संदेश दिला. यावेळी भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा देण्यात आल्या. स्लमडॉग मिलेनियर या भारतीय चित्रपटातील 'जय हो' या ऑस्कर विजेत्या गाण्यावर आंदोलक नाचताना दिसले. यावेळी पोलीसही गाण्यावर थिरकले.
खलिस्तान्यांकडून पराभव मान्य नाही
रविवारी खलिस्तानवाद्यांनी तोडफोड करुन तिरंगा उतरवण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा लावण्यात आला. मंगळवारी शेकडो भारतीय तिथे जमले आणि त्यांनी एकतेचा संदेश दिला. मंगळवारी खलिस्तानींच्या कृतीचा निषेध करण्यासाठी जमलेल्या लोकांपैकी एक म्हणाला – काही लोक भारत आणि येथील शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना उत्तर द्यायला हवे.
दिल्लीत पंजाबी एकवटले
लंडनमधील घटनेविरोधात शिखांनी सोमवारी नवी दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर बॅनर आणि पोस्टर लावले. यावेळी त्यांनी खलिस्तानींच्या विरोधात घोषणाबाजी केली. भारत हा आमचा स्वाभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे यावेळी ते म्हणाले. निदर्शनात सहभागी असलेला एक तरुण शीख म्हणाला - लंडनमध्ये जे घडले, त्याचे उत्तर देण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही हजारो शीख आपापले काम सोडून इथे आलो आहोत, हे सांगण्यासाठी की आम्ही आमच्या तिरंग्याचा अनादर सहन करणार नाही.
लंडनमध्ये नेमकं काय झालं?
पंजाब पोलीस खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवर कारवाई करत आहेत. त्याविरोधात रविवारी लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी याला विरोध केला. खलिस्तानी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पोहोचले. आधी तोडफोड केली आणि नंतर येथे लावलेला तिरंगा काढून टाकला. त्या लोकांच्या हातात खलिस्तानी ध्वज आणि अमृतपाल सिंग याचे पोस्टर होते. पोस्टर्सवर 'फ्री अमृतपाल सिंग', 'आम्हाला न्याय पाहिजे' आणि 'आम्ही अमृतपाल सिंग याच्यासोबत आहोत' असे लिहिले होते. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला.