नव्या कुवेतसाठी भारतीयांचे कौशल्य साहाय्यकारी ठरेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:23 IST2024-12-22T11:23:09+5:302024-12-22T11:23:23+5:30
भारतीयांशी साधला संवाद

नव्या कुवेतसाठी भारतीयांचे कौशल्य साहाय्यकारी ठरेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास
कुवेत : नवे कुवेत घडविण्यासाठी भारतीयांचे मनुष्यबळ, कौशल्य साहाय्यकारी ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. त्या देशात वास्तव्य करून असलेल्या भारतीयांशी त्यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. मोदी हे कुवेतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
गेल्या ४३ वर्षांत कुवेतचा दौरा करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदी यांनी सांगितले की, भारतातून कुवेत येण्यासाठी चार तास लागतात. भारताच्या विविध राज्यांतून कुशल कामगार कुवेतमध्ये नोकरी, व्यवसायासाठी आले आहेत. त्यांच्या रूपाने कुवेतमध्ये एक 'मिनी-इंडिया'च साकारला आहे. दरवर्षी अनेक भारतीय या देशात येतात.
मोदी म्हणाले की, भारतीय अतिशय कष्टाळू आहेत. त्यांच्या कामाची जगभरात तारीफ होते. नवा कुवेत घडविण्यासाठी भारतातील विविध कंपन्या मोठी भूमिका बजावू शकतील. परदेशात काम करणाऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत आहे.
रामायणाच्या अरबी अनुवादकांचे केले कौतुक
महाभारत व रामायण या महान ग्रंथांचा अरबी भाषेत अनुवाद करून तो ग्रंथरूपाने प्रसिद्ध करणाऱ्या अब्दुल्ला अल-बरौन आणि अब्दुल लतीफ अल- नेसेफ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कौतुक केले. दोन महान ग्रंथांच्या अरबी अनुवादाच्या प्रतींवर मोदी यांनी स्वाक्षरी केली.
मोदी यांनी म्हटले आहे की, रामायण, महाभारताचे अरबी भाषांतर पाहून मला आनंद झाला. दोन्ही अनुवादकांमुळे भारतीय संस्कृतीची जागतिक स्तरावर किती लोकप्रियता आहे, हे या अनुवादांच्या रूपाने दिसत आहे. अब्दुल्ला अल-बरौन आणि अब्दुल लतीफ अल-नेसेफ यांच्या कार्याचा मोदी यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यातील मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला होता.