ओबामांकडून भारतीय विद्यार्थ्याची प्रशंसा
By admin | Published: October 23, 2015 02:56 AM2015-10-23T02:56:10+5:302015-10-23T02:56:10+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित विद्यार्थ्याची प्रणव शिवकुमारची तोंडभरून स्तुती केली. प्रणव हा अंतरिक्ष विज्ञानावर संशोधन करीत आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित विद्यार्थ्याची प्रणव शिवकुमारची तोंडभरून स्तुती केली. प्रणव हा अंतरिक्ष विज्ञानावर संशोधन करीत आहे.
ओबामा यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये एस्ट्रोनॉमी नाइटचे आयोजन केले होते. त्यावेळी १५ वर्षीय प्रणवही उपस्थित होता. ओबामा म्हणाले की, ‘प्रणवमध्ये काही साहस करण्याची दृढ इच्छा आहे. गुगल सायन्स फेअरमध्ये दोन वेळेस ग्लोबल फाइनलिस्ट बनलेला प्रणव हा पहिला विद्यार्थी आहे.’
प्रणव सहा वर्षांचा असताना घरात त्याला एक विश्वकोश इनसायक्लोपीडिया मिळाला. अर्थात, त्याची रुची पाहून पालकांनीच तो ठेवला असावा. तेव्हापासून प्रणव अंतरिक्षातील घटनांबाबत विशेष अभ्यास करीत आहे. काही वर्षांपासून त्याचे आईवडील त्याला दर शनिवारी न चुकता एस्ट्रोफिजिक्सच्या प्रयोगशाळेत घेऊन जातात. आठवीत शिकणारा प्रणव जगातील त्या २० विद्यार्थ्यांपैकी एक आहे, ज्यांचे नाव गुगलच्या आॅनलाइन सायन्स स्पर्धेत निवडले गेले. शिकागो विश्वविद्यालयाच्या एका प्रोफेसरसोबत प्रणव सध्या ताऱ्यांशी संबंधित एका विषयावर संशोधन करीत आहे.