लैंगिक छळाबद्दल भारतीय तंत्रज्ञाला ९ वर्षे तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:29 AM2018-12-15T04:29:39+5:302018-12-15T04:30:05+5:30
विमानात महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याच्या खटल्यात भारतीय तंत्रज्ञ प्रभू राममूर्ती (३५, रा. तामिळनाडू) याला गुरुवारी न्यायालयाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
वॉशिंग्टन : विमानात महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याच्या खटल्यात भारतीय तंत्रज्ञ प्रभू राममूर्ती (३५, रा. तामिळनाडू) याला गुरुवारी न्यायालयाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राममूर्ती हा २०१५ मध्ये अमेरिकेत एच-वन बी व्हिसावर आला होता.
तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला भारतात पाठवले जाईल, असे न्यायालयाने सांगितले. सरकारी वकिलाने राममूर्तीला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती.
लास वेगास ते डेट्रॉईट या विमान प्रवासात तीन जानेवारी रोजी राममूर्ती हा पत्नीसोबत प्रवास करीत असताना त्याच्या शेजारी पीडिता प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्यावर लैंगिक हल्ला झाला होता. न्यायाधीश टेरेन्स बर्ग यांनी या कडक शिक्षेमुळे इतर लोक असे गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील, अशी आशा व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
सुरक्षेला प्राधान्य
आपल्यावर लैंगिक हल्ला झाल्याचे समजल्यानंतर पीडितेने विमानातील कर्मचाऱ्यांची मदत मागितली होती. राममूर्तीला झालेल्या शिक्षेवरून विमानातील सगळ्या प्रवाशांची सुरक्षितता फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनसाठी (एफबीआय) सर्वोच्च प्राध्यान्याची असल्याचे एफबीआयचे डेट्राईट विभागाचे विशेष प्रतिनिधी टिमोथी स्लेटर यांनी म्हटले.