चिनी नौदलाच्या संचलनात भारताच्या युद्धनौकांचा सहभाग; पाकिस्तान दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:45 AM2019-04-24T02:45:04+5:302019-04-24T02:45:23+5:30
चीनच्या ३२ युद्धनौका, ३९ विमानांचाही समावेश
बीजिंग : चीनच्या नौदलाला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष संचलनात आयएनएस कोलकातासह भारताच्या दोन युद्धनौकांनी सहभाग नोंदवला. आयएनएस कोलकाता ही देशात निर्माण केलेली सर्वांत मोठी युद्धनौका आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान यापासून दूर राहिला.
चीनचे राष्टÑपती शी जिनपिंग हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या संचलनात पीपल्स लिबरेशन आर्मी नेवीच्या ३२ युद्धनौकांनी सहभाग घेतला. नौदलाची ३९ लढाऊ विमानेही यात सहभागी झाली होती. शी जिनपिंग हे कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाचे अध्यक्ष असण्याबरोबरच लष्कराचे प्रमुखही आहेत.
चीनने आपली पहिली विमानवाहक युद्धनौका लिओनिंगसह आपल्या अत्याधुनिक अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या, विनाशिका, लढाऊ जेटही या संचलनात सादर केले. लिओनिंग ही पूर्व सोव्हियत संघाची युद्धनौका आहे, जी पुन्हा नव्याने तयार करण्यात आली आहे. या संचलनात हवामानाने फारशी साथ दिली नाही व आकाशात धुके व्यापलेले होते. यामुळे उपस्थितांना कमी दृश्यमानतेत हा कार्यक्रम पाहावा लागला. भारताच्या आयएनएस कोलकाता व आयएनएस शक्तीने यात सहभाग घेतला.
मंगळवारी झाली संचलनाची सांगता
भारत, सिंगापूर, रशिया व जपाननेही आपल्या अत्याधुनिक युद्धनौका यात पाठविल्या होत्या. यात १३ देशांनी १८ युद्धनौका पाठविल्या होत्या. चीनच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या युद्धनौकांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले असून, दोन्ही देशांतील लष्करी संबंधांतील सुधारणेचे हे संकेत आहेत, असे म्हटले आहे. मंगळवारी या संचलनाची सांगता झाली.