भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:41 IST2025-01-17T08:40:46+5:302025-01-17T08:41:05+5:30
सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे.

भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार!
तुमच्याकडे फारसं शिक्षण नाहीए, तुमच्याकडे कोणतंही विशेष स्किल नाहीए, परिस्थिती फारशी चांगली नाहीए, वाडवडिलांनी काही कमवून ठेवलेलं नाहीए, जे काही करायचं असेल ते सारं स्वत:च्या हिकमतीवर करायचं आहे, गरिबीतून आणि कर्जाच्या डोंगरातून कुटुंबाला बाहेर काढायचं आहे, ‘श्रीमंत’ व्हायचं आहे, तर काय करायचं?- थोड्या कालावधीत चांगला पैसा कमवायचा असेल तर अनेक भारतीय आखाती देशात जातात. काही वर्षं तिथे राहातात, बक्कळ पैसा कमावतात, स्वत: तिथे ओढग्रस्तीत राहातात; पण तिथे मिळेल ते काम करून भरपूर पैसे भारतात आपल्या घरी, कुटुंबीयांकडे पाठवतात.
विशेषत: गरीब, निम्न मध्यमवर्गीय अशा लोकांनी आखाती देशांत जाऊन आपल्या कुटुंबाची परिस्थिती खरोखरच पालटवली आहे. अशी एक नाही, दोन नाही, हजारो भारतीय कुटुंबं भारतात आहेत. अगदी मजुरीचं का काम होईना; पण त्याच कामाचा भारतात मिळणारा मोबदला आणि आखाती देशांत मिळणारा मोबदला पाहिला तर त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यामुळेच एखाद्या घरातला कोणी कामासाठी म्हणून आखाती देशांत गेला की लवकरच तो आपल्या भावाला, मुलांना तिथे बोलावून घेतो आणि हे सारे मिळून मग आपल्या कुटुंबाची परिस्थितीच बदलून टाकतात.
एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा.. असे अनेक जण मग आखाती देशात स्थायिक होतात. व्हिसा, विमान प्रवासाची तिकिटं, यासाठी बऱ्याचदा ते आपल्या किमती वस्तू, घरंदारं गहाण ठेवूनही पैशाची व्यवस्था करतात. कारण काही महिन्यांत, एखाद-दोन वर्षांतच आपलं सारं कर्ज वगैेरे फेडून आपण सुखवस्तू होऊ याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच भारतातली, विशेषत: उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातील अशी अनेक गावं आहेत, जिथे पुरुषांची संख्या अगदी नावालाच आहे. कारण तिथले बहुसंख्य पुरुष पैसे कमावण्यासाठी आखाती देशांत गेलेले आहेत.
एकट्या सौदी अरोबियाचाच विचार केला तरी २०२४च्या आकडेवारीनुसार तिथे साधारण २५ लाख भारतीय राहातात. अर्थातच यातले बहुतांश निम्नस्तरीय वर्गांतील आहेत. अशीच अवस्था इतर आखाती देशांतही आहे. पण ही परिस्थिती आता बदलू शकते. भारतातून येणाऱ्या लोकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सौदी अरेबियानं आता आपल्या ‘वर्क व्हिसा’वर निर्बंध आणले आहेत आणि त्यासंदर्भातले नियम संक्रांतीपासून म्हणजे १४ जानेवारी २०२५पासून बरेच कडक केले आहेत.
सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे. यासंदर्भात ज्यांची पात्रता कमी असेल, त्यांना वर्क व्हिसातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं कमअस्सल माणसं आमच्याकडे येऊ नयेत असं आमचं धोरण आहे, असं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे यासंदर्भात आता कडक तपासणी करून मगच देशात प्रवेश दिला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहेे. सौदी अरेबियात बांगला देशानंतर सर्वाधिक भारतीय कामगार आहेत. सौदीप्रमाणेच संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि कुवेत यांसारख्या इतर आखाती देशांतही लाखो भारतीय काम करतात. सौदीनंतर हे देशही आपल्या देशात येणाऱ्या भारतीयांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची शक्यता आहे.