भारताचे पितळ उघडे पडले - पाकिस्तान
By admin | Published: February 19, 2015 09:41 AM2015-02-19T09:41:56+5:302015-02-19T09:46:01+5:30
पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ - पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. पाक बोटीमध्ये कसा स्फोट घडला हे भारताने स्पष्ट करावे अशी मागणी पाकिस्तानने केली असून या घटनेमुळे भारताचा दुष्ट चेहरा समोर आला अशी टीकाही पाकिस्तानी नेत्यांनी सुरु केली आहे.
३१ डिसेंबर २०१४ रोजी गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली बोट संशयास्पदस्थितीत आढळली होती. या बोटीचा भारताच्या तटरक्षक दलाने पाठलाग केला असता बोटीतील चौघा संशयित दहशतवाद्यांनी बोटीत बाँबस्फोट घडवत बोटीला उडवले असे सांगितले जात होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोटीतील संशयीत अतिरेक्यांनी स्वतःच बोटीला आग लावून स्फोट घडवून आणला असा दावा केला होता. मात्र बुधवारी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्ष बी.के. लोशाली यांच्या एका व्हिडीओने केंद्र सरकारची चांगलीच कोंडी केली. त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, मला त्या मंडळींना बिर्यानी द्यायची नव्हती असे लोशाली यांनी म्हटल्याचे व्हिडीओत दिसत आहे. लोशाली यांनी संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी विसंगत भूमिका मांडल्याने वाद निर्माण झाला असून पाक बोटीचे नेमके झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्ताननेही यावरुन भारतावर टीका केली.
भारताचा दुष्ट चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला असून त्यांचे शांततेसाठी काय प्रयत्न सुरु आहेत असा खोचक टोलाही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी लगावला आहे.तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती मागवल्याचे सांगितले.