भारताच्या निर्णयाने ब्रिटनला झटका; तात्काळ भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:51 PM2023-03-22T17:51:46+5:302023-03-22T17:52:17+5:30
रविवारी खलिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील तिरंगा हटवला होता.
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थकांकडून होणारे हल्ले आणि हिंसाचार टाळण्यासाठी लंडनमधीलभारतीय उच्चायुक्तालयाबाहेर बुधवारी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याठिकाणी जादा पोलीस आणि जादा बॅरिकेड्स लावण्यात आले होते. दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटवण्याच्या भारताच्या निर्णयानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी बुधवारी ब्रिटिश उच्चायुक्तालयासमोरील अतिरिक्त बॅरिकेड्स हटवले. उच्चायुक्तालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अतिरिक्त बॅरिकेड्स अडथळे निर्माण करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. दिल्लीतील पोलिसांची ही कारवाई लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानी निदर्शनाच्या एका दिवसानंतर घडली.
भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा
मध्य लंडनमधील इंडिया प्लेस म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीबाहेर पोलिस अधिकारी, संपर्क अधिकारी आणि गस्ती अधिकारी ड्युटीवर दिसले. रविवारच्या घटनेनंतर येथे मोठा तिरंगा फडकवण्यात आला. तसेच, काल इथे शेकडो भारतीय खलिस्तानींविरोधात एकवटले. यावेळी त्यांनी भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा देण्यासोबतच जय हो गाण्यावर डान्स केला.
रविवारी काय घडलं?
खलिस्तान समर्थकांनी रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाचा तिरंगा काढून टाकला होता. 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलक निदर्शने करत होते. मात्र, या घटनेनंतर काही वेळातच भारतीय राजनयिकांनी उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा फडकावला. याप्रकरणी एका खलिस्तानी समर्थकाला अटक करण्यात आली.