ई-कचरा निर्मात्यांत भारत पाचवा
By admin | Published: April 20, 2015 12:23 AM2015-04-20T00:23:41+5:302015-04-20T01:55:05+5:30
ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते
संयुक्त राष्ट्रे : ई-कचरा तयार करण्यात भारताचा जगात पाचवा क्रमांक असून २०१४ साली भारताने १७ लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा व इलेक्ट्रिकल साहित्य नष्ट केले होते असा संयुक्त राष्ट्राचा अहवाल असून, येत्या तीन वर्षांत जगातील ई-कचरा २१ टक्केपर्यंत वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्राचा विचारगट युनो विद्यापीठाने जागतिक ई-कचरा अहवाल २०१४ तयार केला आहे. या अहवालानुसार २०१४ साली अमेरिका व चीन या देशांनी ३२ टक्के ई-कचरा तयार केला. अमेरिकेच्या मागे चीन, जपान व जर्मनी असे देश आहेत. भारताचा क्रमांक या यादीत पाचवा आहे. २०१४ साली जगात तयार झालेला बहुतांश ई-कचरा आशिया खंडात तयार झाला. हा कचरा १६ मे. टन किंवा प्रत्येक व्यक्तीमागे ३.७ कि. ग्रॅ. असा होता.
हा कचरा तयार करणाऱ्या तीन प्रमुख आशियाई देशात चीन (६ मे. टन), जपान (२.२ मे. टन) व भारत (१.७ मे. टन) यांचा समावेश होता. युरोपमधील नॉर्वे, स्वीत्झर्लंड, आइसलँड व युके हे देश ई-कचरा तयार करण्यात आघाडीवर आहेत. ई-कचरा सर्वात कमी करणारे देश आफ्रिका खंडात असून, त्यांनी एकूण १.९ मे. टन ई- कचरा तयार केला आहे. गेल्यावर्षी ४१.७ टन एवढा ई-कचरा झाला होता. या कचऱ्याचा वापर करून न्यूयॉर्क ते टोकिओ हा दुहेरी प्रवास करता येऊ शकतो. (वृत्तसंस्था)