ब्रिक्सच्या विकास बँकेचा पहिला अध्यक्ष भारताचा
By Admin | Published: July 16, 2014 10:02 AM2014-07-16T10:02:13+5:302014-07-17T00:08:12+5:30
जागतिक बँकेला सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी ब्रिक्स समुहातील पाच देशांनी मिळून विकास बँकेची स्थापना करण्याचा निर्णय ब्रिक्स संमेलनात घेण्यात आला आहे.
ऑनलाइन टीम
फोर्टेलिझा (ब्राझील), दि. १६ - जागतिक बँकेला सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी ब्रिक्स समुहातील पाच देशांनी मिळून विकास बँकेची स्थापना करण्याचा निर्णय ब्रिक्स संमेलनात घेण्यात आला आहे. सुमारे ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करुन ही बँक सुरु करण्यात येणार असून या बँकेचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान भारतीयाला मिळणार आहे.
ब्रिक्स समुहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होते. २०१२ मध्ये या देशांनी मिळून ब्रिक्स विकास बँकेची स्थापना करण्याची कल्पना मांडण्यात आली होती. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झालेल्या बैठकीत या संकल्पनेला मंजूरी मिळाली. आता ब्राझीलमधील फोर्टेलिझा येथे सुरु असलेल्या बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मंजूरी मिळाली. मंगळवारी झालेल्या बैठकीत ब्रिस्कमधील सदस्य देशांनी या बँकेच्या करारावर स्वाक्षरी केली. या बँकेची सुरुवात ५० अब्ज डॉलर्सने केली जाईल. बँकेचे मुख्यालय चीनमध्ये ठेवण्यावरुन सुरुवातीला सदस्य देशांनी विरोध दर्शवला होता. मात्र मुख्यालय चीनमधील शांघाय येथे असले तरी त्याचे नियोजन भारत, रशिया आणि ब्राझीलकडे असणार आहे. सुरुवातीचे पाच वर्ष भारत, त्यानंतर अनुक्रमे ब्राझील आणि रशियाकडे ५-५ वर्षांसाठी बँकेचे नियोजन सोपवले जाईल. यानूसार बँकेच्या सीईओपदासाठी भारतातील एका व्यक्तीची निवड होणार आहे. या बँकेचे विभागीय कार्यालय दक्षिण आफ्रिकेत असेल.
या बँकेच्या स्थापनेमुळे आर्थिक मंदीचा सामना करावा लागणा-या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी घेण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया ब्राझीलच्या अध्यक्षा डिल्मा रोझेफ यांनी दिली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सर्वांना एकत्र घेऊन चालणा-या विकास मॉडेलची पाठराखण केली.
दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सुमारे ४० मिनीटे ही बैठक झाली. यात मोदींनी सुरक्षा आणि उर्जा क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्यावर भर दिला. तसेच पुतिना यांना भारत दौ-यावर निमंत्रीत केले.