भारताचा मित्र ‘लुना’ घेऊन निघाला चंद्रावर, उतरून पाणी शोधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:26 AM2023-08-12T05:26:33+5:302023-08-12T05:26:49+5:30
‘चंद्रयान ३’च्या दोन दिवस आधी रशियन यानाच्या लँडिंगची शक्यता
मॉस्को : भारताचा मित्र रशियाने ४७ वर्षांनंतर आपली चंद्रमोहीम सुरू केली असून, चंद्रयान ‘लुना-२५’ शुक्रवारी प्रक्षेपित केले आहे. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्रावरील पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. १९७६ नंतर रशियाने प्रथमच चंद्रयान पाठवले आहे.
अमूर ओब्लास्टमधील वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून हे प्रक्षेपण करण्यात आले. हे ठिकाण मॉस्कोपासून पूर्वेस सुमारे ५,५५० किमी अंतरावर आहे.
रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, लुना-२५ चंद्रावर रवाना झाले आहे. सुमारे ५ दिवस चंद्राच्या दिशेने त्याचा सलग प्रवास राहील. यानंतर ते ७-१० दिवस चंद्राच्या कक्षेत फिरेल आणि २१ किंवा २२ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते. भारताने १४ जुलै रोजी चांद्रयान-३ लाँच केले जे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे.
प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होणार
रशियाने यापूर्वी १९७६ मध्ये मिशन लुना-२४ चंद्रावर उतरवले होते. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्रमोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल.
८०० किलो
लँडरचे वजन असून, ते मातीचे नमुने घेऊन विश्लेषण करणार
४६.३ मीटर
लांब हे रॉकेट असून, ते सोयूझ २.१ बी रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले.
३१३ टन
वजनाचे हे रॉकेट असून, त्याचा व्यास १०.३ मीटर आहे.
४टप्पे
रॉकेटने लुना-२५ लँडर पृथ्वीच्या बाहेर गोलाकार कक्षेत सोडले.
‘लुना-२४’ने काय केले?
१९७६ मध्ये प्रक्षेपित केलेले लुना-२४ सुमारे १७० ग्रॅम चंद्राच्या धुळीसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले होते.
इस्रो म्हणाले...
तुम्हाला शुभेच्छा
इस्रोने रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉस्मॉस’चे ‘लूना-२५’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्याबद्दल अभिनंदन केले. आमच्या प्रवासात आणखी एक भेट आश्चर्यकारक आहे. तुम्हाला शुभेच्छा.