अमेरिकेपेक्षा भारताचा विकास दर चांगला - डोनाल्ड ट्रम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2016 08:20 AM2016-10-20T08:20:03+5:302016-10-20T11:43:18+5:30
डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये आज तिसरी आणि शेवटची प्रेसिडेंशिअल डिबेट सुरु आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २० - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करता भारत आणि चीनचा विकास दर अधिक आहे. भारत आठ टक्के तर चीन सात टक्के विकास दराने प्रगती साधत आहे. या दोघांशी तुलना करता अमेरिकेच्या विकास दराची गती फारच मंद आहे. आपला विकास दर अधिकाधिक खालावत चालला आहे तिस-या प्रेसिडेंशिअल डिबेटमध्ये अर्थव्यवस्थेसंबंधीच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे उत्तर दिले.
हिलरी क्लिंटन यांच्या आर्थिक धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली. हिलरी क्लिंटन यांचा टॅक्स प्लान म्हणजे आपत्ती आहे असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीला तीन आठवडयांचा अवधी बाकी असताना नेवाडा विद्यापीठामध्ये रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये तिसरी प्रेसिडेंशिअल डिबेट पार पडली.
अमेरिकेचा रोजगाराचा अहवाल खूपच धक्कादायक असून, अमेरिकेचा व्यवसायामध्ये तोटा वाढत चालला आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये आज तिसरी आणि शेवटची प्रेसिडेंशिअल डिबेट झाली. स्थलांतरीत, गर्भपात, बंदूक अधिकार, रोजगार आणि विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरुन दोन्ही उमेदवारांनी परस्परांना टार्गेट केले. पहिल्या दोन डिबेट दोन्ही उमेदवारांनी परस्परांवर केलेल्या व्यक्तीगत आरोपांमुळे गाजल्या होत्या.
या डिबेटमध्येही ट्रम्प आणि हिलरी यांनी परस्परांवर व्यक्तीगत आरोप केले पण त्याचबरोबर रशिया, सिरिया, रोजगार या महत्वाच्या विषयांवरही आपली भूमिका कशी राहिल ते स्पष्ट केले. अमेरिकेत प्रेसिडेंशिअल डिबेटच्या चर्चेला फार महत्व असते.
या चर्चेतील मुद्यांच्या आधारे मतदार आपले मत निश्चित करतात. त्यामुळे या डिबेटमध्ये उमेदवार आपल्या वाकचार्तुयाने जास्तीत जास्त मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. याआधीच्या दोन फे-यांमध्ये हिलरी क्लिंटन यांनी सरशी साधली होती. तिस-या फेरीत ट्रम्प चित्र पालटणार ? ते लवकरच स्पष्ट होईल.
काय म्हणाले ट्रम्प
- मी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देईन, त्यामुळे जीडीपी एक टक्क्यांहून 4 टक्क्यांपर्यंत जाईल.
- हिलरी क्लिंटन यांना हजारो निर्वासितांना आश्रय देण्याची इच्छा आहे, त्यात अनेक इसिसचे एजंट असतील.
- सिरियाचे राष्ट्राध्यक्ष असाद हिलरी क्लिटंन आणि बराक ओबामा यांच्यापेक्षा कठोर आणि हुशार आहेत.
- तुम्ही क्लिंटन फाऊंडेशनसाठी सौदी अरेबियाकडून पैसा घेतला आणि तुम्ही महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत आहात.
- मी महिलांचा जितका आदर करतो तितका आदर कोणी करत नाही, महिलांचा विनयभंग केल्याचे माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, तो हिलरी क्लिंटन यांच्या प्रचाराचा एक भाग होता.
- मी कंपनी चालवतो तसा देशा चालवला तर, देशालाही अभिमान वाटेल.
- मी माझ्या पत्नीचीही माफी मागितलेली नाही कारण मी काही चुकीचे केलेले नाही.
- हिलरी क्लिटंन यांचा कर वाढवण्याचा विचार असून, त्या तुमच्यावर दुप्पट कर लादतील.
- मी निवडून आलो तर, जास्तीत जास्त मुक्त व्यापाराला संधी देईन.
काय म्हणाल्या हिलरी क्लिटंन
- ओबामा यांनी मंदीपासून अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवले.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा कामगारांकडून ट्रम्प टॉवर बांधून घेतला.
- डोनाल्ड ट्रम्प हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हातची कळसूत्री बाहुली आहेत.
- अब्जोपतींपेक्षा अमेरिकेत आलेले स्थलांतरीत जास्त कर भरतात.
- क्लिंटन फाऊंडेशनमुळे जगातील १ कोटी १० लाख लोकांना एचआयव्ही/एडस सारख्या रोगावर उपचार घेता आले.
- मला क्लिंटन फाऊंडेशनबद्दल बोलायला आवडेल कारण ती जगातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्य करणारी संस्था आहे.
- अमेरिकेने आपल्या सहका-यांबरोबर शांततापूर्ण चांगले संबंध ठेवले आहेत, पण डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सहका-यांनाच त्रास द्यायचा आहे.