अमेरिकेत भारताचा जयघोष
By admin | Published: September 29, 2014 07:48 AM2014-09-29T07:48:22+5:302014-09-29T07:48:22+5:30
स्वातंत्र्यदेवतेला साक्ष ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या समर्थ उभारणीसाठी असंख्य अनिवासी भारतीयांना भावनिक साद घातली
न्यूयॉर्क : अटलांटिक महासागरात दिमाखात उभ्या असलेल्या स्वातंत्र्यदेवतेला साक्ष ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या समर्थ उभारणीसाठी असंख्य अनिवासी भारतीयांना भावनिक साद घातली. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये २१ व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल असा दुर्दम्य विश्वास व्यक्त करतानाच मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी भारताच्या प्रगतीला हातभार लावण्याचे आवाहन मोदी यांनी करताच तेथे जमलेल्या ८० हजारांवर अनिवासी भारतीयांनी ‘भारत माता की जय’चा अपूर्व जयघोष केला.
एका परीने मोदींनी उभ्या जगाला भारताच्या आगामी वाटचालीचा संदेश दिला. टाळ््यांचा प्रचंड कडकडाट, मनमुराद हंशा आणि मोदी...मोदी...चा जयघोष अशा विलक्षण प्रतिसादात हिंदीतून मोदींनी प्रवासी भारतीयांच्या हृदयाला हात घातला.
मोदींच्या भाषणाला लागलेल्या रांगा, याचि देही याचि डोळा हे भाषण अनुभवण्यासाठी झालेली गर्दी यांतून मोदी काय बोलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मोदी... मोदी...च्या जयघोषातच त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. नवरात्रीच्या शुभेच्छा देत त्यांनी भाषणाला सुरुवात करतानाच तरुणाईच्या सामर्थ्याला सलाम केला. साप आणि गारुड्यांचा देश अशी संभावना झालेल्या भारतातील आणि परदेशी गेलेले भारतीय तरुण आता सापांशी नव्हे, तर माऊसशी खेळतात आणि जगाला गुणवत्तेच्या बळावर घुमवतात, असा गौरवास्पद उल्लेख त्यांनी केला. तेव्हा तमाम भारतीयांचा उर अभिमानाने भरून आल्याचे जाणवत होते. अमेरिकेतील अनेक सिनेटर, गव्हर्नर यांच्या साक्षीने अमेरिकेतील भारतीयांना त्यांनी भावनिक साद घातली. मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तुमची शाळा, तुमचे गाव, तुमचा देश यासाठी जमेल तेव्हढे करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
लोकसभा निवडणुकीने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी मी पूर्णत्वास नेणार असे ते ठामपणे म्हणाले. भारताची तीन शक्तिस्थळे नमूद करताना मोदींनी लोकशाही, लोकसंख्या आणि भारतीय बाजारपेठ या मुख्य बाबींचा उल्लेख केला. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. मोठी बाजारपेठ असल्यामुळे भारताला जगभर मागणी आहे, असे ते म्हणाले. युवा पिढी ही भारताचे बलस्थान आहे. युवाशक्तीला कमकुवत बनविणारे काहीही आम्ही होऊ देणार नाही. जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्यात आमचे सरकार शंभर टक्के यशस्वी होईल, असे त्यांनी सांगताच गर्दीतून पुन्हा मोदी- मोदींचा जल्लोष झाला. निराश होण्याचे काहीही कारण नाही, भारत अतिशय वेगाने वाटचाल करीत आहे. २१ वे शतक भारताचे असेल. २०२० पर्यंत केवळ भारतच जगाला मनुष्यबळ पुरविण्याच्या स्थितीत असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. परिचारिका आणि शिक्षकांची मागणी वाढत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
विकास ही लोकचळवळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे व मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचे त्यांनी आवाहन करताच उपस्थितांनी एकच प्रतिसाद दिला.
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचा संदर्भ देत त्यांनी गांधीजींच्या १९१५ मध्ये भारतात परत येण्याचा दाखला दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या २०२२ मधील अमृतमहोत्सवापूर्वी स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करून गांधीजींच्या स्मृतीचा आदर राखण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. मोदींच्या या भाषणाकडे करोडो भारतीयांचे डोळे लागले होते. अक्षरश: असंख्य भारतीयांनी हे भाषण टीव्हीच्या पडद्यावर डोळा भरून अनुभवले.