भारताच्या मध्यमवर्गाची अमेरिकेशी स्पर्धा
By Admin | Published: May 30, 2014 03:28 AM2014-05-30T03:28:10+5:302014-05-30T03:28:10+5:30
जग झपाट्याने बदलत आहे. ब्राझीलपासून भारतापर्यंत विकसित होणारा मध्यमवर्ग अमेरिकेशी स्पर्धा करीत आहे,
वॉशिंग्टन : जग झपाट्याने बदलत आहे. ब्राझीलपासून भारतापर्यंत विकसित होणारा मध्यमवर्ग अमेरिकेशी स्पर्धा करीत आहे, नवे लोकशाही देश उदयाला येत आहेत, नव्या अर्थव्यवस्था व बाजार विकसित होत आहेत, अमेरिकेला जगाच्या या बदलत्या रूपाला प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. जग झपाट्याने बदलत आहे, यामुळे नव्या संधी समोर येत आहेत; पण त्यातही धोके आहेत, असे ओबामा म्हणाले. ते वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीत बोलत होते. अमेरिकेवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर आपल्याला हे कळून चुकले आहे की, जागतिकीकरणामुळे चुकीच्या माणसाच्या हातात तंत्रज्ञान पडले की दहशतवादाला बळ मिळते व निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो. रशियाच्या आक्रमकतेने युरोपीय देशात भीतीची लाट पसरली आहे, तर चीनच्या आर्थिक प्रगतीमुळे शेजारी देश चिंतेत आहेत. ब्राझीलपासून भारतापर्यंत नवा मध्यमवर्ग अमेरिकेशी स्पर्धा करीत असून, त्यांच्या सरकारांच्या मताला जागतिक समुदायात महत्त्व आले आहे. विकसनशील देशांच्या बाजारपेठा विकसित होत असून, २४ तास चालणार्या वेबसाईट व सोशल मीडियाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष करणे कठीण बनले आहे. या नव्या जगाशी सामना करणे हे तुमचे कर्तव्य आहे, तसेच जगभर शांतता व समृद्धी पोहोचविण्याचे कामही करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. अमेरिका या जगात एकाकी राहू शकत नाही. मित्रदेशांना बरोबर घेऊनच चालले पाहिजे, असा संदेश ओबामा यांनी यावेळी दिला. (वृत्तसंस्था)