वायू प्रदूषणामुळे भारतीयांचा अकाली मृत्यू
By Admin | Published: February 22, 2015 12:03 AM2015-02-22T00:03:12+5:302015-02-22T00:03:12+5:30
वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल,
शिकागो : वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल, असा गंभीर इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने तर भारताला सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या देशांच्या यादीत टाकले आहे. या विद्यापीठांनी सखोल अभ्यासाअंती काढलेल्या निष्कर्षानुसार वायू प्रदूषणामुळे भारतीय लोक तीन वर्षे आधीच मरण पावतात.
‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’च्या ताज्या अंकात अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सुरक्षित मापदंडापेक्षाही अधिक प्रमाणात सूक्ष्म कण पदार्थांचे प्रदूषण असलेल्या भागात भारतातील ६६ कोटी लोकसंख्या राहते. मापदंडाचे पालन करून वायू प्रदूषण भारताने आटोक्यात राखल्यास भारतीयांचे आयुष्य आणखी तीन वर्षांनी वाढू शकते. एवढेच नाही तर २.१ अब्ज जीवन वर्षे वाचतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ही मोठी किंमत...
वायू प्रदूषणामुळे दोन अब्जाहून अधिक जीवन वर्षांचे नुकसान होणे म्हणजे वायू प्रदूषणामुळे मोजावी लागणारी मोठी किंमत आहे, असे मत हार्वर्ड केनेडी स्कूलच्या अॅव्हिडेन्स फॉर पॉलिसी डिझाईनच्या संचालक रोहिणी पांडे यांनी म्हटले आहे. भारत किफायतशीर मार्गाने ही स्थिती बदलू शकतो. या अहवालात येल विद्यापीठाचे निकोलस रेयान, हार्वर्डच्या जान्हवी नीलकेणी, अनिश सुगाथन आणि शिकागो विद्यापीठाचे अनंत सुदर्शन यांचे लेख आहेत. भारत सरकारने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. तथापि, आणखी उपाय करणे जरूरी आहे.(वृत्तसंस्था)
४भारताने आर्थिक वृद्धीवर अधिक लक्ष द्यायला हवे; परंतु वृद्धीच्या पारंपरिक व्याख्येमुळे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांकडे दुर्लक्ष झाले. वायू प्रदूषण भारतीयांच्या अकाली मृत्यूचे कारण बनले असून आर्थिक वृद्धीही धीमी होत आहे.
४वायू प्रदूषणामुळे उत्पादन घटते, आजारपण वाढते. परिणामी आरोग्यावरील खर्चाचा बोजाही वाढत जातो, असे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोतील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे संचालक मायकल ग्रीनस्टोन यांनी म्हटले आहे.
४जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या २० शहरांपैकी भारतातील १३ शहरे असून यापैकी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. श्वसनाशी संबंधित आजारामुळे भारतात होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.