अमेरिकन वस्तूंवरील आयात करास भारताची पुन्हा स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:45 AM2018-09-19T05:45:28+5:302018-09-19T05:45:59+5:30
आता २ नोव्हेंबरपर्यंत करांची अंमलबजावणी लांबणीवर
नवी दिल्ली : अमेरिकेच्या २९ वस्तूंवर लादलेल्या वाढीव आयात कराच्या अंमलबजावणीस भारताने दुसऱ्यांदा स्थगिती दिली असून, २ नोव्हेंबरपर्यंत या करांची अंमलबजावणी आता लांबणीवर पडली आहे.
अमेरिकेने भारताविरुद्ध लावलेल्या वाढीव आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने जूनमध्ये या करांची घोषणा केली होती. ४ आॅगस्टपासून त्यांची अंमलबजावणी होणार होती. तथापि, या करांना ४५ दिवस स्थगिती देऊन अंमलबजावणी १८ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. या करांना आता पुन्हा एकदा स्थगिती देऊन अंमलबजावणी २ नोव्हेंबरपर्यंत लांबविण्यात आली आहे. नव्या निर्णयाशी संबंधित अधिसूचना काल रात्री जारी करण्यात आली.अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ मार्च रोजी एक निर्णय घेऊन स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर कठोर आयात कर लावले होते. या निर्णयाचा भारताला फटका बसणार असल्यामुळे भारताने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या २९ वस्तूंवर वाढीव आयात कर लावण्याचा निर्णय घेतला होता.
सूट मिळवण्यासाठी हालचाली
अमेरिकेने लादलेल्या वाढीव आयात करातून भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियमला सूट मिळावी, यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जनरलाइज्ड सिस्टीम आॅफ प्रेफरन्सेस (जीएसपी)अंतर्गत आपल्या वस्तूंना निर्यातीचे लाभ मिळावेत, अशी भारताची मागणी आहे. १९७६ साली करण्यात आलेल्या जीएसपी करारामुळे भारताच्या ३,५00 वस्तूंना करमुक्त अमेरिकी बाजार उपलब्ध झालेला आहे.