कॅनडाच्या संसदेत येणार भारताच्या ऐक्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:26 AM2018-03-02T03:26:28+5:302018-03-02T03:26:28+5:30
खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांच्या भारत दौ-यातील भोजन समारंभास दिल्या गेलेल्या निमंत्रणावरून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.
टोरँटो : खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांच्या भारत दौ-यातील भोजन समारंभास दिल्या गेलेल्या निमंत्रणावरून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. विरोधक भारताच्या ऐक्याचा आणि खलिस्तानी फुटीरवाद्यांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडणार आहेत.
त्रुदेऊ यांचा भारत दौरा उधळून लावण्यासाठी भारतातील काही हितशत्रुंनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्याचा आरोप त्रुदेऊ यांच्या राष्ट्रीय सल्लागाराने केल्यानंतर मंगळवारी कॅनडाच्या संसदेत अटवाल प्रकरण उपस्थित झाले. मात्र हा आरोप निराधार असल्याचे भारताने म्हटले आहे.
कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते अॅन्ड्रु शीर त्रुदेऊ म्हणाले की, खलिस्तानी फुटीरवाद्यांचा निषेध करणारा आणि भारताच्या ऐक्याला पाठिंबा देणारा प्रस्ताव विरोधी पक्ष संसदेत मांडणार आहे.
प्रस्तावात म्हटले आहे की, हे सभागृह कॅनेडियन शिख आणि भारतीय वंशाच्या कॅनेडियन्सनी आमच्या राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवतो. आम्ही अखंड भारताच्या बाजुने उभे आहोत.
गेल्या आठवड्यात त्रुदेऊ यांच्या भारत दौºयात मुंबईत त्यांच्या पत्नीसोबतच्या छायाचित्रात अटवाल दिसला होता. त्यावरून वाद झाला आणि दिल्लीत त्रुदेऊ यांच्यासोबत भोजनाचे अटवाल यांना असलेले निमंत्रण रद्द झाले. अटवाल हा अनेक वर्षांपासून भारताच्या काळ््या यादीत आहे.
त्रुदेऊ यांनी मला अटवाल माहीत नसल्याचे म्हटले आहे तर अटवाल याने कॅनडातील वृत्तपत्रांना मी त्रुदेऊ यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)