विविधतेतील एकता हीच भारताची शक्ती - मोदी
By Admin | Published: November 13, 2015 11:58 PM2015-11-13T23:58:40+5:302015-11-13T23:58:40+5:30
भारताची विविधता हीच आपली शान आणि शक्ती आहे, भारताला कबीर आणि रहीमची शिकवण प्रेरणा देते, भारतीय जगात जिथे गेले, तिथे सर्वांसोबत मिळून राहण्याचे संस्कार घेऊन गेले आहेत
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १३ - भारताची विविधता हीच आपली शान आणि शक्ती आहे, भारताला कबीर आणि रहीमची शिकवण प्रेरणा देते, भारतीय जगात जिथे गेले, तिथे सर्वांसोबत मिळून राहण्याचे संस्कार घेऊन गेले आहेत, असे व्यक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, ते ३ दिवसाच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लंडनमधील वेम्बले स्टेडियममध्ये ६०,००० अनिवासी भारतीयांना ते संबोधित करत होते. वेम्बले स्टेडियममध्ये नरेंद्र मोदींचे स्वागत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केले.
>> लंडनमधील वेम्बले स्टेडियममधील मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे.
- भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.
- ब्रिटिश संसदेसमोर महात्मा गांधी यांचा पुतळा असणे गौरवाची बाब आहे.
- महात्मा गांधी यांचा संदेश जगासाठी प्रेरणादायक
- जो देश तरुण आहे, तो देश विकासाच्या स्पर्धेत मागे राहणार नाही
- गेल्या १८ महिन्यांच्या अनुभवावरुन सांगू शकतो, भारताला गरीब राहण्याचा अधिकार नाही
- शामजी कृष्ण वर्मांची शेवटची इच्छा डेव्हिड कॅमेरून यांनी पूर्ण केली
- भारताला जगाकडून उपकार नकोत, बरोबरीचं स्थान हवंय
- रेल्वेचा खूप जलद गतीने विकास होत आहे, रेल्वेमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) केला आहे
- भारतात आज स्वच्छता हे एक आंदोलन बनले आहे, देशाला अस्वच्छेतेपासून मुक्त करणे हे माझे स्वप्न
- आता केवळ विकासाच्या वाटेवरच चालणार आहे
-
>> लंडनमधील वेम्बले स्टेडियममधील ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनयांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- केम छो वेम्बले! बोलून भाषणाची सुरूवात गुजराती भाषामधून केली.
- भारतात अच्छे दिन जरूर येणार
- भारताला संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी ब्रिटनचा पाठिंबा
- ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान होण्याचा दिवस दुर नाही
- भारताच्या गुंतवणूकीमुळे ब्रिटनमध्ये रोजगार उत्पन्न
> मोदींच्या भाषणापुर्वी ६०० कलाकारांचा परफॉर्म
नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये वेंब्ली स्टेडियममध्ये ६०,००० भारतीय समुदायासमोर भाषण केले, भाषण सुरु होण्यापुर्वी जवळपास ६०० भारतीय आणि लंडनमधील कलाकारांनी परफॉर्म सादर केले. मराठमोळ्या ढोल-ताशांपासून ते राजस्थानी नृत्याचीही झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी भारत आणि इंग्लंडच्या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या काही परफॉर्मन्सनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. यामध्ये मराठमोळ्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आई अंबेचा उदो उदो आणि गणपती बप्पा मोरया या गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. यावेळी स्टेडियममधील वातावरण भक्तिमय झाले होते.
> पंतप्रधान नरेंद्र मोदीं - राणी एलिझाबेथ भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता राणी सोबत बंकिंगहम पॅलेसमध्ये शाही भोजनाचा अस्वाद घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मोदी यांनी ५४ वर्षापुर्वीच्या त्यांच्या भारत दैऱ्यातील काही निवडक छायाचित्रे भेट म्हणून दिली.