इसिस भारताच्या उंबरठ्यावर
By Admin | Published: May 14, 2015 03:58 AM2015-05-14T03:58:06+5:302015-05-14T03:58:06+5:30
पोलिसांच्या गणवेषात आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी कराची शहरात शिया इस्माइली मुस्लिमांच्या बसवर हल्ला केला असून, बसमधील लोकांना
कराची : पोलिसांच्या गणवेषात आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी कराची शहरात शिया इस्माइली मुस्लिमांच्या बसवर हल्ला केला असून, बसमधील लोकांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारले. या हत्याकांडात ४७ लोक ठार झाले. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अफगाण दौऱ्यात अफगाणचे शत्रू ते आमचे शत्रू अशी घोषणा केली त्यास २४ तास उलटण्याच्या आत हा हल्ला झाला आहे. घटनास्थळी टाकण्यात आलेल्या पत्रकाद्वारे इसिसने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे. इसिसने कराचीत घडविलेल्या या हत्याकांडाचा भयसूचक अन्वयार्थ असा, की इसिस भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे!
बसवर गोळीबार
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ते आठ हल्लेखोर मोटारसायकलवरून आले व त्यांनी प्रथम बसवर कराचीतील डाऊ मेडिकल कॉलेजजवळ गोळीबार केला. हल्लेखोरांनी ४७ लोकांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारले असून, त्यात १६ महिला आहेत व २० लोकांपेक्षा जास्त जखमी झाले आहेत. बसमध्ये ६० लोक होते. शिया मुस्लिमांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला, असे सिंध प्रांताचे पोलीस महानिरीक्षक गुलाम हैदर जमाली यांनी पत्रकारांना सांगितले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.