संयुक्त राष्ट्रात भारताचा वरचष्मा, INCBच्या लढाईत चीनला पछाडत मिळवला विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 10:58 AM2019-05-08T10:58:09+5:302019-05-08T10:58:18+5:30
संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे.
वॉशिंग्टनः संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे. भारताच्या जगजित पोवाडिया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डा(INCB)च्या सदस्यपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या चीनच्या हाओ वेई यांचा पराभव करत लक्षणीय मतांसह विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या पहिल्या फेरीच्या मतदानात जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली. खरं तर निवडणूक जिंकण्यासाठी फक्त 28 मतांची गरज असते. मंगळवारी 54 सदस्यीय इकोनॉमिक अँड सोशल काऊंसिलच्या 5 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आलं. या 5 सदस्य जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत असलेल्या सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जगजित पोवाडिया यांनी INCBच्या सदस्यपदी पुन्हा निवड झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे. तसेच निष्पक्षरीत्या मी सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
India’s Jagjit Pavadia tops all comers in 15 candidate field.
— Syed Akbaruddin (@AkbaruddinIndia) May 8, 2019
We are deeply grateful to all India’s many friends who ensured such a huge win in a very competitive election . 🙏🏽 pic.twitter.com/ff0f7fZxzZ
चीननं आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी विकसनशील देशांबरोबर लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा चीनला पराभव पत्करावा लागला आहे. चीनच्या हाओ वेई यांना पहिल्या टप्प्यात फक्त 22 मतं मिळाली, तर दुसऱ्या टप्प्यात फक्त 19 मतं मिळाली. ते निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी 28 मतं मिळवू शकले नाहीत. तर दुसरीकडे भारताच्या जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली आहेत. पोवाडिया यांच्याबरोबरच फ्रान्स आणि कोलंबोचे उमेदवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. त्यांचा कार्यकाळ 2 मार्च 2020मध्ये सुरू होणार असून, 2025मध्ये ते त्या पदावर राहणार आहेत.