भारताचा गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात जाणार, इम्रान खान सरकारने दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:25 AM2021-11-23T08:25:23+5:302021-11-23T08:25:37+5:30
गेल्या महिन्यात अफगाणिस्तानसंदर्भात रशियात झालेल्या मॉस्को फॉरमॅटमध्ये भारताने तालिबानी नेत्यांची भेट घेऊन अफगाणिस्तानला तात्काळ मानवतावादी मदत देऊ केली होती.
इस्लामाबाद:पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने भारताचा गहू अफगाणिस्तानात पाठवण्याचे मार्ग खुले केले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व मंत्रालयांना मदत देण्याचे निर्देश दिले. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानसंदर्भात रशियात झालेल्या मॉस्को फॉरमॅटमध्ये भारताने तालिबानी नेत्यांची भेट घेऊन अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देऊ केली होती.
अनेक देशांची अफगाणिस्तानला मदत
तालिबान राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानात भारताकडून ही पहिली मदत असेल. यापूर्वी इराण, यूएई आणि पाकिस्तानसारख्या देशांनी अफगाणिस्तानला रसद आणि वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. नुकत्याच आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, अफगाणिस्तानातील सुमारे 4 कोटी लोकांना अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो, तर सुमारे 9 लाख आधीच उपासमारीच्या मार्गावर आहेत.
पाकिस्तान सरकारच्या बैठकीत निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तान इंटर-मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशन सेल(AICC) च्या बैठकीत अफगाणिस्तानला जास्तीत जास्त सुविधा देण्याचे निर्देश सर्व मंत्रालयांना दिले. त्यांनी 5 अब्ज रुपयांची मानवतावादी मदत तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले, ज्यात 50,000 मेट्रिक टन गहू, आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा, हिवाळी निवारा आणि इतर पुरवठा यासह अन्नपदार्थांचा समावेश आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, वित्त सल्लागार शौकत फयाज तारीन, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ आणि वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.
अफगाणिस्तान मदत घेण्यास तयार
गेल्या महिन्यात भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून 50 हजार मेट्रिक टन गहू वाघा सीमेवरुन पाठवण्याची विनंती भारताने पाकिस्तानला केली होती. त्यानंतर अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर अहमद मुट्टाकी यांनीही गेल्याच आठवड्यात पंतप्रधान इम्रान खान यांना भारताकडून पाकिस्तानमार्गे येणारा गहू येऊ देण्याची विनंती केली. यानंतर अखेर इम्रान खान यांनी पाकिस्तानमार्गे भारतीय गहू जाऊ देण्यास परवानगी दिली आहे.
अफगाणिस्तानात मुले भुकेने मरू शकतात
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस लाखो मुले उपासमारीने मरू शकतात. तालिबान सत्तेनंतर अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीवर WHO च्या वक्तव्याने पुन्हा जगाचे लक्ष वेधले आहे. हिवाळ्याच्या मोसमात अफगाणिस्तानातील तापमान कमी असेल आणि भुकेने अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागू शकतो. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, WHO ने सांगितले की, वर्षाच्या अखेरीस सुमारे 32 लाख अफगाण मुले तीव्र कुपोषणाला बळी पडतील. यापैकी सुमारे 10 लाख बालकांना मृत्यूच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो.