अमेरिकेतील शिकागो येथे अंधाधुंद गोळीबार, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 08:28 AM2020-07-22T08:28:33+5:302020-07-22T08:29:21+5:30
शिकागोमधील ग्रेशम येथे मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, वाहनातून आलेल्या एका व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला.
शिकागो (अमेरिका) - अंधाधुंद गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेतील शिकागो शहरात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी या गोळीबारात किमान १४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी शिकागो पोलिसांना एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिकागोमधील ग्रेशम येथे मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, वाहनातून आलेल्या एका व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १४ जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असले तरी हल्लेखोराबाबतची अधिक माहिती पोलिसांनी दिलेली नाही.
शिकागो अग्निशमन दलाचे प्रवक्ते लैरी लँगफोर्ड यांनी सांगितले की, अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून एकूण ११ जणांना रुग्णालयात दाखल केले. तर अन्य लोकांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्यापैकी काही लोकांची प्रकृती गंभीर होती.
At least 11 people hospitalized after shooting in Chicago's Gresham neighbourhood: US Media
— ANI (@ANI) July 22, 2020
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. आम्ही जागोजागी मृतदेह पडलेले पाहिले. त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार झाल्याचे दिसत होते, आम्हाला एकवेळ युद्धच सुरू झाल्याचा भास झाल्याचे स्थानिक रहिवासी अर्निटा गर्डर यांनी सांगितले.